WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महिला सक्षमीकरणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण आवश्यक - प्राचार्य संजयकुमार सिंह.

Image

गडचांदूर:- येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून "Women's Empowerment & Skill Development", यावर एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयोजन महाविद्यालयाच्या इंग्रजी तसेच शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने व महाविद्यालयाशी M.O.U. असलेल्या अवशेश्र्वर टेक्सटाइल्स इंडस्ट्रीज, गडचांदुर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यशाळेच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की महिला दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत.असे असले तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. एवढेच नाही तर त्या सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांनाही बळी पडत आहे. आणि म्हणूनच महिलांवरील बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत. असेही ते म्हणाले.

महिलांना रोजगाराच्या दृष्टीने त्यांच्या पुढील आयुष्यात एक कमाईचे साधन म्हणून 'शिवणकाम' हे एक अत्यंत उपयुक्त साधन आहे त्याचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थिनींना व्हावा याच उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थीनींनी हिरीरीने भाग घेतला होता. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अवशेश्र्वर टेक्सटाइल्स इंडस्ट्रीज, गडचांदुर चे व्यवस्थापक श्री. मोहन पांडे व प्रमुख पाहुणे श्री. रवी पांडे हे होते.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व या इंडस्ट्रीज मध्ये प्रशिक्षण घेऊन तिथेच प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या मीना उलकलवार, सोनाली वाघमारे व पायल येमुले यांनी "महिलांना शिवणकामात प्रशिक्षित होणे का गरजेचे आहे" यावर आपल्या बोलक्या प्रतिक्रिया दिल्यात. आपल्या भाषणातून त्यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी या प्रशिक्षणात भाग घ्यावा असे भावनिक आवाहन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, IQAC चे समन्वयक प्रा. डॉ. संजय गोरे, कु. माया मसराम, प्रा. मंगेश करंबे, प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील बीडवाईक यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. सतेंदर सिंह यांनी मानले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share