WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रवासीच नसल्याने मडगाव मंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस रद्द

Image

मडगाव: कोरोनाच्या भीतीचा परिणाम आता सार्वजनिक वाहतुकीवरही दिसत असून प्रवासीच नसल्याने कोकण रेल्वेने मडगाव मंगळुरू इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी ३१ मार्चपर्यंत रद्द केली आहे. दक्षिण रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने म्हटले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर आरक्षणेही रद्द होऊ लागली असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांना विचारले असता प्रवाशांची संख्याच कमी झाल्याने ही गाडी रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. १९ मार्चपासून ही गाडी रद्द करण्यात आली आहे. इतर गाड्यांमधील प्रवासीदेखील कमी येऊ लागले असून कोकण रेल्वेच्या महसुलावरही त्याचा परिणाम झाला आहे.घाटगे यांना विचारले असता ते म्हणाले, आरक्षण निम्म्याने रद्द झाले आहे. मडगावचे कोकण रेल्वेचे जंक्शन हे देशातील काही मुख्य जंक्शनपैकी एक असून दररोज सरासरी दहा हजार प्रवासी उतरायचे. मात्र आता हेही प्रमाण निम्म्यावर आले असून स्थिती सुधारली नाही तर ही संख्या अधिकच कमी होईल.दरम्यान कोकण रेल्वेच्या मडगाव स्थानकावर प्रवाशांची थर्मल गनने तपासणी सुरू झाली असून मुख्य गेटवरुन आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जाते. सध्या दोनच गन्स उपलब्ध असल्याने एकाच बाजूने स्क्रीनिंग चालू केले असून आणखी गन्स उपलब्ध झाल्यानंतर स्थांनकाच्या मागच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणखी गन्ससाठी ऑर्डर दिली असल्याचे त्यांनी सांगितले.खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर कोकण रेल्वेचे कम्युनिटी केंद्र आहे, त्याठिकाणी आयसोलेशन सेंटर उघडण्यात आले असून त्या ठिकाणी दहा खाटांची तजवीज करण्यात आली असून जर कुणी संशयीत सापडला तर त्याला प्रथम या केंद्रात ठेऊन नंतर गोमेकोत हलविण्यात येणार असल्याचे त्यांनी संगितले. मडगाव रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम आणि प्लॅटफॉर्मवर बसण्याच्या जागाही वारंवार निर्जंतुक करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी दिली

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share