WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मद्यमुक्त चंद्रपुरात बनावट दारूमुळे १८ जणांचा मृत्यू !

Image

चंद्रपूर : मद्यमुक्त चंद्रपूर जिल्हय़ात दारूबंदीच्या काळात विषारी व बनावट दारू पिऊन १८ लोकांचा मृत्यू झाला तर दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात ६३ लोकांचा बळी गेला. याशिवाय जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मद्यसेवनामुळे झालेल्या आजारात ४६७ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक आकडेवारी दारूबंदी समीक्षा समितीच्या अहवालातून समोर आली आहे.

जिल्हा दारूबंदी समीक्षा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना अहवाल सोपवला. त्यातील धक्कादायक माहिती आता उघडकीस आली आहे. त्यानुसार, २०१५ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विषारी व बनावट दारू पिल्यामुळे १८ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा पोलीस दलाने घेतली आहे. तसेच दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे २०१० ते २०१४ या कालावधीत १०७ अपघात झाले तर दारूबंदीच्या २०१५ ते २०१९ या कालावधीत १०४ अपघात झाले. दारूविक्री सुरू असताना २०१०ते २०१९ या कालावधीत दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे झालेल्या अपघातात ४८ जणांचा मृत्यू झाला तर २०१५ ते २०१९ या काळात ६३ लोकांचा अपघातात बळी गेला. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालण्याच्या घटना ११३८ झाल्या. याउलट दारू सुरू असतानाच्या काळात ११५०अशा घटना घडल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शहर व ग्रामीण भागात दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ४६७ सांगितली आहे. यामध्ये चंद्रपूर शहरात १३६ मृत्यू तर ग्रामीण भागात ३३१ मृत्यू झाले आहेत. मद्यसेवनामुळे १७ हजार ७३६ लोक विविध आजाराने ग्रस्त आहेत, तर मद्य सेवन करीत असलेल्यांची संख्या १० हजार २१२ सांगण्यात आली आहे.

दारूविक्रेत्या महिलांच्या संख्येत १३८ टक्के वाढ

चंद्रपूर जिल्ह्यत दारूबंदीनंतर अवैध दारूविक्री, मद्य तस्करी, दारूबंदीचे गुन्हे १९८ टक्के, दारूविक्रेत्या आरोपींची संख्या १९३ टक्के, अवैध दारूविक्रेत्या महिला आरोपींची संख्या १३८ टक्के तर यातीलच बाल गुन्हेगारांच्या संख्येत १ हजार १५८ टक्के वाढ झाली आहे. शिवाय दारूबंदी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेण्या हल्ल्यातही वाढ झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share