WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संशोधक म्हणतात, ‘हा’ रक्तगट असणाऱ्यांना करोनाचा सर्वाधिक धोका !

Image

चीनमधील वुहान येथून फैलाव झालेल्या करोना विषाणूची लागण जगभरातील एक लाख ९७ हजराहून अधिक जणांना झाली आहे. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या सात हजारहून अधिक झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केलं आहे.

जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये करोनावर लस शोधण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. अमेरिकेमध्ये प्रायोगिक तत्वावर या लसीची चाचपणी सुरु झाली आहे. याच दरम्यान, करोना ज्या देशातून पसरण्यास सुरुवात झाली त्या चीनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनामधून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. चीनमध्ये करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या रक्तगटांचा अभ्यास संशोधकांनी केला आणि त्यामधून त्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षांनुसार अ रक्तगट (A Blood Group) असणाऱ्यांना करोना होण्याचा सर्वाधिक धोका असतो असं संशोधकांनी म्हटलं आहे. तर ओ रक्तगट (O Blood Group) असणाऱ्यांना करोनाचा धोका कमी असतो असं या अभ्यासामधून दिसून आलं आहे.

संशोधकांनी नक्की काय केलं?

चीनमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादूर्भाव झालेल्या वुहान आणि शेंझेन प्रांतातील दोन हजारहून अधिक रुग्णांच्या रक्तगटाचा संशोधकांनी अभ्यास केला. यावेळेस अ रक्तगट असणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे लक्षात आले. तसेच अ रक्तगट असणाऱ्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे अधिक तीव्र असल्याचेही संशोधकांना दिसून आलं. तर दुसरीकडे ओ रक्तगट असणाऱ्यांना करोनाचा सर्वात कमी धोका असल्याचे संशोधकांच्या निरिक्षणामध्ये दिसून आलं.

यूएस नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये ओ रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या ३७ टक्क्यांहून अधिक आहे. तर ब रक्तगट (B Blood Group) असणाऱ्याची संख्या ३२ टक्क्यांहून अधिक आहे. भारतात अ रक्तगट असणाऱ्यांची संख्या २२.८८ टक्के इतकी आहे. तर सर्वात कमी म्हणजे अ ब रक्तगट (A B Blood Group) असणाऱ्यांची संख्या ७.७४ टक्के इतकी आहे.

चीनमध्ये साडेतीन हजारहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाची लागण झालेल्यांपैकी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अगदी दोन ते तीन टक्क्यांदरम्यान आहे. मात्र ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १५ टक्के आहे. त्यामुळेच अ रक्तगट असणाऱ्या वृद्ध लोकांना करोनाचा धोका जास्त असल्याचे म्हणता येईल.

ओ रक्तगट असणाऱ्या करोनाग्रस्तांची संख्या कमी असली तरी त्यांनी सर्व खबरदारीचे उपाय आणि सूचनांचे पालन करणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share