WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळात कोरोनाचे आठ पॉझिटीव्ह; सात परप्रांतीय

Image

यवतमाळ : कोरोना संशयितांचे बुधवारी एकापाठोपाठ अहवाल प्राप्त झाले असून त्यात आठ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या आठ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी एकच जण स्थानिक नागरिक असून उर्वरित सात जण रोजगाराच्या निमित्ताने आलेले परप्रांतीय आहेत. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ही बाब स्पष्ट केली.
यवतमाळातून आतापर्यंत ६५ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले. त्यापैकी ५१ अहवाल प्राप्त झाले असून १४ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. ५१ पैकी ४३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. तर आठ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. यापैकी स्थानिक नागरिक असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाचे वय ६० वषार्पेक्षा अधिक आहे. इतर सात जण परप्रांतीय आहेत. ते २५ मार्चपासून भोसा रोडवरील एका ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने वास्तव्याला होते. त्यामध्ये चार उत्तरप्रदेशातील, दोन पश्चिम बंगालचे तर एक दिल्लीचा आहे. त्यांचे वय १५ ते ४५ वर्षे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या संशयावरून नागरिकांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला २९ जणांचे नमुने नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. परंतु तेथील लॅब बंद पडल्याने हे नमुने पुण्याच्या नॅशन इन्टिट्युट आॅफ व्हायरॉलॉजीकलकडे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला. त्यातील सात जण पॉझिटीव्ह निघाले. तर १४ जणांचे नुमने नागपूरच्या एम्सकडे पाठविण्यात आले होते. त्यातील १३ जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. एक अप्राप्त आहे. प्राप्त पैकी एक पॉझिटीव्ह तर १२ निगेटीव्ह आहे.

कळंब चौक परिसर सील करणार
एकाच दिवशी आठ कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांचे वास्तव्य असलेला भोसा ते कळंब चौक हे क्षेत्र सील केले जाणार असून घरोघरी सर्वेक्षण होणार आहे. या परिसराचे निर्जतुकीकरण करण्यात येणार आहे.

संचारबंदीची अंमलबजावणी कठोर
पॉझिटीव्ह रुग्ण आढळताच यवतमाळ शहर व जिल्ह्यात पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी आणखी कठोर केली आहे. कोणत्याही कारणांशिवाय फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जात आहे.

पहिल्या तिघांची प्रकृती ठणठणीत
यवतमाळात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारानंतर ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share