WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लातूरकडे निघालेले ११ जण ताब्यात

Image

वणी : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, ‘आहात तेथेच थांबा’ असा संदेश मुख्यमंत्र्यांकडून वारंवार दिला जात असतानाही अडकून पडलेले नागरिक आपापल्या गावाकडे जाण्यासाठी धडपड करीत आहेत. लॉकडाऊन असताना चंद्रपुरातून एका आयशर ट्रकमध्ये बसून लातूरकडे निघालेल्या १० मजुरांसह ट्रकचालकाला सोमवारी पहाटे वणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणी १० मजूर व ट्रकचालकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांना वणीलगतच्या पळसोनी येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. शेरखॉ पठाण नूरमोहम्मद असे आयशर चालकाचे नाव असून तो लातूर जिल्ह्यातील आघोरी येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध वणी पोलिसांनी कलम १८८, २६९, ५१६, २,३, ६६, १९२ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आयशरमधून लपून प्रवास करणारे अहेमद पठाण गुड्डू पठाण, शेख अमजद शेख गफ्फूर, सलिम पठाण पाशा पठाण, उमेश संगनाथ कांबळे, सुलेमान पठाण जलाल पठाण, शेख मुन्ना शेख मकबूल, शेख ताजुद्दीन, शेख ईलाही, शेख आमिर शेख शामीर, शहजान खलील पटेल, आतार मेनुद्दीन ईलाही या १० जणांविरुद्ध कलम १८८, २७१, ५१६, २, ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी-चंद्रपूर मार्गावर झोला फाटा येथील पोलीस चौकीवर वाहनांची तपासणी केली जात असताना प्रवासी वाहतुकीचा हा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी लगेच आयशर चालकासह आयशरमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याने त्यांना वसतिगृहात ठेवण्यात आले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share