WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

BREAKING | यवतमाळ | वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्याचा महत्वपूर्ण निर्णय...यवतमाळ शहर ३ दिवस असणार ताळेबंद...

Image

यवतमाळ, दि. 23 : गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या सात जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 13 वर पोहचली आहे. हे सातही जण आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या पुर्वीच्या पॉझेटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कात आले होते. यात काही जण त्यांच्या कुटुंबातील सदस्यसुध्दा आहेत, असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले आहे.


सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 13 पॉझेटिव्हसह एकूण 25 जण भरती आहेत. गत 24 तासात यात 11 जणांची भर पडली. जिल्ह्यात 150 जण संस्थात्मक विलगीकरणात तर 794 जण गृह विलगीकरणात आहेत. सद्यस्थितीत 32 अहवाल अप्राप्त असल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.


जिल्ह्यात एकूण सहा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. मात्र सातत्याने एकाच प्रतिबंधित भागातून हे पॉझेटिव्ह रुग्ण आढळत असल्याने या भागाच्या सीमाबंदीचा परीघ आता वाढविण्यात येणार आहे. या भागात सुरवातीपासूनच प्रशासनाच्यावतीने प्रभावी सर्व्हे सुरू केला आहे. तसेच नियमितपणे येथील जास्तीत जास्त नमुने नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात येत आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात संपूर्णपणे लॉकडाऊन राहणार असून प्रशासनाच्यावतीने आवश्यक वस्तुंचे वितरण करण्यात येईल.


आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस यवतमाळ शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र दवाखाने आणि औषधींची दुकाने यातून वगळण्यात आली आहे. तसेच उर्वरीत जिल्ह्यात प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसारच दुकाने सुरू राहतील. नागरिकांनी केंद्र शासन, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून मानवी साखळी तोडण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share