WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दिड महिन्यानंतर दुकाने सुरु झाल्याने शहरातील बाजारपेठ फुलली

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढत असल्याने निर्धारित वेळेत बंद असलेल्या व्यवसायांनाही सुरु करण्याची परवानगी मिळावी याकरिता व्यावसायिकांनी शासन दरबारी तगादा लावल्याने व काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांची मागणी उचलून धरल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने संचार बंदी शिथिल करीत रात्री उशिरा परिपत्रक काढून बंद असलेल्या जवळपास सर्वच दुकानांना सुरु करण्याची सशर्त परवानगी देण्यात आल्याचे सोशल मीडियाद्वारे कळविण्यात आले.
प्रत्येक व्यवसायांची साप्ताहिक विभागणी करण्यात आली असून वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवता येणार आहे. त्याचबरोबर सोशल डीष्टनसिंगच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दारूची दुकानेही आजपासून सुरु झाल्याने दारू दुकानांपासून काही अंतरापर्यंत तळीरामांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत होत्या.एखादा नवीन चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहाबाहेर जशा तिकिटांसाठी रांगा लागतात त्याहीपेक्षा जास्त झुंबड या दारू दुकानांपुढे पाहायला मिळत होती. त्यामुळे जोपर्यंत हा मद्यरुपी चित्रपट शोकीनांच्या दृष्टीपथास पडणार नाही किंवा ते तृप्त होणार नाही,तोपर्यंत हाऊसफुलच राहणार आहे. एकदा का त्यांचं मन भरलं की गर्दी आपसूकच ओसरू लागेल. अशा प्रतिक्रिया आज शहरात उमटत होत्या. परंतु सामाजिक अंतर राखण्याचं भान विक्रेता व ग्राहक या दोघांनाही ठेवावं लागणार आहे.
कोरोनामुळे मागील दिड महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आल्याने त्यावर अवलंबून असलेल्या रोजमजुरांवर उपासमारीची वेळ आली. उद्योग व्यवसाय बंद पडल्याने शासनाचीही आर्थिक कोंडी झाली. सतत वाढणारा लॉकडाऊन व त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे उद्योजक व मजूरवर्ग चांगलाच वैतागला होता. त्यामुळे ठराविक वेळेत अन्य दुकानेही सुरु करावी ही मागणी जोर धरू लागली. यास प्रतिसाद देत शासनाच्या अनुमतीने जिल्हा प्रशासनाने परिपत्रक काढून सर्वच व्यवसायांना सुरु करण्याची सशर्त परवानगी देऊन प्रत्येक व्यवसायांचे ठराविक दिवस नेमून देण्यात आले आहे. तसेच दुकानांच्या वेळांमध्ये बदल करून सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत दुकाने सुरु ठेवता येणार आहेत. आज शहरातील बंद असलेले बहुतांश व्यवसाय सुरु झाल्याने काही वेळा करीता का होई ना बाजारपेठ फुलून दिसत होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share