WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दारूची दुकाने खुली करण्यावरून आमदार खासदारांमध्ये मतभेद

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आलेली जवळपास सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरु झाली असतानाच जिल्हा प्रशासनाने दारूंची दुकानेही खुली करण्यास अनुमती दिल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आमदार, खासदारांच्या वर्चस्वाच्या लढाईत मद्यप्रेमी भरडल्या जात आहे. त्यांच्या या वरचढीच्या राजकारणामुळे दारू दुकानांवर गदा येऊ नये ही भिती तळीरामांमध्ये निर्माण झाली असून उजाडणारा दिवस दारू दुकानांच्या चर्चेने सुरु होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

चार दिवसापूर्वी सुरु झालेली दारूची विक्री सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याच्या कारणास्तव आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने बंद करण्यात आली. परंतु सोमवाऱी बंद असलेल्या इतर सर्व दुकानांबरोबरच दारूची दुकानेही सुरु झाल्याने पुन्हा एकदा आमदार बोदकुरवार यांनी दारू दुकाने बाजारपेठेत येत असल्याने ती तत्काळ बंद करावी अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याने संतप्त झालेल्या खासदार बाळू धानोरकर यांनी दम असेल तर दारूची दुकाने बंद करून दाखवा असा अप्रत्यक्ष इशाराच आमदार बोदकुरवार यांना दिला आहे. त्यामुळे त्यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले असून त्यांच्या चढाओढीच्या राजकारणाची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. एकाची केंद्रात तर दुसऱ्याची राज्यात सत्ता असल्याने दोघेही एकमेकांना जुमानत नसल्याने वणीकरांचे रोजगार व इतर सोइ सुविधांचे अनेक प्रश्न अधांतरी पडले आहेत. वणी क्षेत्रातील कोळसा खदानींच्या विस्तारीकरणा करीता अनेक मान्यताप्राप्त ट्रान्सपोर्ट कंपन्या याठिकाणी कार्यरत असतांना देखील स्थानिक कुशल तरुणांना या कंपन्यांमध्ये रोजगार मिळत नाही कारण इथंही राजकारण आडवं येत. स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करण्या करिता प्रत्येक राजकीय पुढारी कंपनीवर दबाव आनु पाहत असल्याने येथील तरुणांना रोजगार देण्यास कंपन्या असमर्थता दर्शवितात. येथील राजकारण्यांच्या श्रेष्ठत्वाच्या लढाईत रोजगारांबरोबरच इतरही सोइ सुविधांनी तालुका मागासलेलाच राहिला आहे. कोरोना विरुद्ध एकजुटीने लढायचे आहे असे देशपातळीवरून सांगितल्या जात असतांना येथील राजकीय नेत्यांच्या अस्तित्वाच्या लढायाच संपत नाहीत. दारू दुकानांचा कांगावा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा या राजकीय नेत्यांनी शहरातील इतर समस्यांकडे लक्ष द्यावे अशा चर्च्या आता व्हायला लागल्या आहेत. या दोन्ही राजकीय नेत्यांच्या वरचढीच्या राजकारणात मद्यप्रेमींचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. आज सुरु असलेली दारू दुकाने उद्या बंद तर होणार नाही ना हि एकच चर्चा त्यांच्यामध्ये ऐकायला मिळते. इतर सर्व बाजारपेठ सुरु झालेली असतांना दारू दुकानांनाच का टार्गेट केले जाते हा एकाच प्रश्न त्यांच्या डोक्यात घर करून आहे. तेंव्हा दारू दुकानांचं राजकारण न करता शहरातील रोजगाराचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष देण्याची आज नितांत गरज असल्याचे शहरात बोलल्या जात आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share