WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सलून व्यवसाय सुरु करण्यास लॉकडाऊन मधून सूट मिळेल काय ?

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :- कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये म्हणून देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन वस्तूंची दुकाने वगळता संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. त्यामध्ये केश कर्तनालयांचाही समावेश होता. परंतु ११ मे रोजी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिल करीत बंद असलेली इतर सर्वच दुकाने मर्यादित वेळेत सुरु करण्यास परवानगी दिली असतांना सलून व्यावसायिकांना लॉकडाऊन मधून सूट न मिळाल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी दिसून येत आहे.

लॉकडाऊन घोषित केल्यापासून इतर दुकानांबरोबरच केश कर्तनालये ही बंदच असल्याने व्यवसायिकांबरोबरच दुकानातील कारागिरांवरही आर्थिक संकट ओढावले असून बहुतांश व्यावसायिक व कारागिरांना उदरनिर्वाहाचे प्रश्न पडले आहेत. सतत वाढणाऱ्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या उपजीविकेची बिकट समस्या निर्माण झाली असून नाभिक संघटनांनी या व्यावसायिक व कारागिरांना आर्थिक मदत देण्याची मागणी शासन दरबारी केली होती. त्यांना मदत तर मिळालीच नाही पण इतर दुकानांन प्रमाणे सलून सुरु करण्यास अनुमतीही मिळाली नाही. सलून व्यावसायिकांचा ग्राहकांशी जवळून संपर्क येत असल्याच्या कारणास्तव त्यांना परवानगी नाकारण्यात आली पण नियम धाब्यावर बसवून शेंकडोंची भीड निर्माण होणाऱ्या दुकानांना मात्र सहज परवानगी देण्यात आली.कारण काय तर त्यापासून शासनाला लाखोंचा महसूल मिळतो. मग त्या गर्दीमध्ये किमान अंतर नसलं तरी चालतं. इतर सर्व दुकानांना अटी नियम घालून सुरु करण्यास अनुमती देण्यात आली. मग सलून व्यावसायिकांनाही नियम अटी बांधून व्यवसाय सुरु करण्यास का अनुमती मिळत नाही हाच प्रश्न या नाभिक बांधवांना पडला आहे. लघु व मध्यम व्यवसाय बंद पडू नये म्हणून शासन विविध पॅकेज जाहीर करीत असतांना येथे पारंपरिक व्यवसाय मागील दिड महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे सलून व्यवसायही सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात यावी ही मागणी या नाभिक व्यासायिकांकडून करण्यात येत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share