WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वैद्यकीय तपासणी न करताच हातावर मारले जातात होम कोरंटाईनचे शिक्के

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे :-
परप्रांतातून शहर व तालुक्यात परतणाऱ्या किंवा शहरातून स्वगावी जाणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असतांना देखील साधन सामुग्रीच्या अभावामुळे नागरिकांची कसलीही तपासणी न करता केवळ त्यांच्या हातावर होम कोरंटाईनचा शिक्का मारून त्यांना शहरात एन्ट्री दिल्या जात असल्याने पळसोनी येथील शासकीय वस्तिगृहात उभारण्यात आलेले कोविड केयर सेंटर केवळ शिक्का मारण्यापुरतेच मर्यादित आहे काय, असे प्रश्न शहरातील सुज्ञ नागरिक विचारात आहेत.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने नागरिकांना आहे तेथेच थांबण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु हाताला काम व पोटाला भाकर मिळणेही दुरापास्त झाल्याने विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांनी स्वगावी परतण्याचा आग्रह धरल्याने प्रशासनाने योग्य त्या वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना स्वगृही रवाना केले. परंतु त्यांना रवाना करण्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना डॉक्टरांचे सर्टिफिकेट देण्याचे बंधन असतांनाही त्यांची कसलीही तपासणी न करताच सर्टिफिकेट देण्यात आले. त्याचप्रमाणे अन्य जिल्हे व राज्यातून शहरात परतलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असतांना केवळ त्यांच्या हातावर होम कोरंटाइनचा शिक्का मारून त्यांना शहरात एन्ट्री दिली जात आहे. कोरंटाईनचा शिक्का मारल्यानंतर घरातच राहणे बंधनकारक असतांना काही महाभाग घराबाहेर निघत असल्याने तसेच त्यांची तपासणी न झाल्याने शेजारी धास्तावले असून बाहेर पडण्याच्या कारणावरून एकमेकांमध्ये चांगलीच भांडणे होतांना दिसत आहेत. आरोग्य विभागाने ५ किमी अंतरावर असलेल्या पळसोनी येथील शासकीय वसतिगृहामध्ये कोविड सेंटर उभारले आहे. परंतु येथील कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर चालत असल्याने तेथे होम कोरंटाईनचे शिक्के मारण्यापलीकडे अन्य कोणत्याही तपासण्या केल्या जात नाही. डॉक्टरांनकडे सुरक्षेच्या सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनाही जीवावर उधार होऊन कामे करावी लागत आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोणत्याही सोई सुविधा पुरविण्यात आल्या नाही. पीपीई किट, ग्लव्हज व मस्कचा अपुरा पुरवठा होतो. पाच हजार रुपये किमतीचे थर्मल स्क्यानर मशिनही याठिकाणी उपलब्ध नाही. सुविधांअभावी रुग्णांची तपासणीही झाडाखाली करण्यात येते. विशेष म्हणजे याठिकाणी डॉक्टर व परिचारिका कंत्राटी आहेत. या सेंटरवर येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या हातावर होम कोरंटाईनचा शिक्का मारण्यात येतो. शिक्काच मारायचा असेल तर मग रखरखत्या उन्हात इतक्या लांब का बोलविता असे प्रश्न याठिकाणी आलेला व्यक्ती विचारतो आहे. आरोग्य विभाग व व्यवस्थापन समितीकडे थर्मल स्क्यानर मशीन व सुरक्षा किट्स घेण्यास २० - २५ हजार रुपयेही नसावे हे एक कोडेच आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवर यांनी आरोग्य सेवेकरिता जाहीर केलेले ५० लाख रुपये गेले तरी कुठे हा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो आहे. महसूल विभागाचे दोन अधिकारी स्वतः डॉक्टर असतांना आरोग्य विभागाची झालेली दयनीय अवस्था म्हणजे वणीकरांचे दुर्भाग्यच समजावे लागेल.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share