WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

परजिल्हा व अतिसंवेदनशील भागातून शहरात येणाऱ्यांची आरोग्य तपासणी होत नसल्याची वणीकर जनतेची तक्रार

Image

प्रशांत चंदनखेडे, वणी :-
कोरोना महामारीचा महानगरांमध्ये उद्रेक होत असतांना त्याठिकाणांवरून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी न करता केवळ हातावर होम कॉरंटाईनचे शिक्के मारण्याचा सपाटा लावणाऱ्या आरोग्य प्रशासना विरोधात वणीतील काही सुज्ञ नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून त्यासंदर्भातील काही मागण्यांचे निवेदनही त्यांना सादर केले आहे.

कोरोना या साथीच्या रोगाने काही जिल्हे व महानगरांमध्ये चांगलाच शिरकाव केला असून या ठिकाणचे रुग्ण दिवसांगणिक वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून ही शहरे हॉसस्पॉट घोषित करण्यात आली आहे. या शहरांमध्ये वणीतील नागरिक रोजगार व शिक्षणासाठी वास्तव्यास होते. संचार बंदीमुळे त्यांना स्वगृही येणं श्यक्य झालं नाही. शासनाच्या नवीन धोरणानुसार परजिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्याची मुभा देण्यात येऊन त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात आली. त्यामुळे राज्य व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेली मंडळी मिळेल त्या साधनाने वणीमध्ये दाखल होत आहे. परठिकाणांवरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आधी वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यांना कॉरंटाईन करण्याचे शासनाचे आदेश असतांना येथील आरोग्य विभाग मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. पळसोनी येथील कोविड सेंटरमध्ये परजिल्हा व अतिसंवेदनशील भागातून येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे कोणतेही सौजन्य दाखवण्यात येत नाही. शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या पळसोनी येथे कोविळ सेंटर उभारण्यात आले असून तेथे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. त्याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची साधी विचारपूस करून सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे नसल्यास हातावर होम कॉरंटाईनचा शिक्का मारून १४ दिवसांकरिता घरात राहण्याच्या सूचना दिल्या जातात. हातावरील शिक्केही दोन तीन दिवसांतच निघत असल्याच्या तक्रारीही आहेत. वैद्यकीय तपासणी न करता शहरात एंट्री दिली जात असल्याने येथील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण होत आहे. कोरोनाची लक्षणे त्वरित दिसत नाहीत त्यामुळे आरोग्य तपासणी करून त्यांना दोन तीन दिवस अलगीकरणात ठेऊन नंतर होम कॉरंटाईन करावे अशी मागणी येथील सुज्ञ नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्यांमध्ये सर्व पक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व शहरातील सुज्ञ नागरिकांचा समावेश आहे. प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसह त्यांच्या इतर मागण्यांमध्ये शहरात इतर जिल्हा व प्रांतातून येणाऱ्या मालवाहतूकदार ट्रक ड्रायव्हरांची आरोग्य तपासणी व्हावी तसेच वाहनांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, शहरात निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या अविरत सुरु ठेवाव्या यांचा समावेश असून निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक, आमदार, पोलीस निरिक्षक वणी व नगर परिषद मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share