WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रेती तस्करांच्या दादागिऱ्या वाढल्या

Image

महसूल अधिकाऱ्या समोरच रेती खाली करून ट्रक पळविला

प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना या साथीच्या रोगामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू असल्याने व्यावसायिक व कामगारवर्ग आर्थिक अडचणीत सापडला असतांना गैर मार्गाने पैसा कामविणाऱ्यांसाठी लॉकडाऊनचा हा काळ सोने पे सुहागा ठरला आहे. तस्करांनी या काळामध्ये लाखोंची माया जमविली असून सामान्यवर्ग रोजगारा अभावी या काळात भरडल्या गेला आहे. तस्करीच्या माध्यमातून झटपट पैसा मिळवता येत असल्याने गुंड प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात या धंद्यात उतरले आहेत. प्रशासनाची जराही भीती न बाळगता राजरोसपणे तस्कऱ्या सुरु असून त्यांना वदरहस्तांचे पाठबळ मिळत असल्याने तस्करांच्या दादागिऱ्या वाढतच चालल्या आहेत. नुकतीच गणेशपूर येथील छोरीया टाऊनशिपमध्ये रेती तस्करीची घटना उघडकीस आली असून तस्करांच्या मुजोरीने अधिकारी वर्गालाही धास्तीत टाकले आहे.

छोरीया टाऊनशिप मधील रंगनाथ रेसिडन्सीच्या मागे रेती भरलेला ट्रक खाली होत असल्याची माहिती मिळाल्याने मंडल अधिकारी महेंद्र देशपांडे हे तलाठी बन्सीलाल सिडाम यांना सोबत घेऊन घटना स्थळी पोहचले असता त्यांना MH ३४ M ३६३१ क्रमांकाचा रेती भरलेला ट्रक त्याठिकाणी उभा दिसला. त्या ट्रक चालकाला रेतीघाटाचा परवाना मागितला असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे सदर मंडल अधिकाऱ्याने वाहन तहसील कार्यालया समोर लावण्यास सांगितले परंतु ट्रक चालकाने जाग्यावरून ट्रक हलविण्यास नकार देत मालकाला फोन लावून घटना स्थळी बोलावले. काही वेळातच ट्रक मालक उमेश पोद्दार त्याठिकाणी आला. त्यालाही घाटाच्या परवान्याबाबत विचारले असता त्यानेही परवाना नसल्याचे सांगत बळजबरीने ट्रक मधील रेती खाली केली व अधिकाऱ्यांनाच दमदाटी करत तो ट्रकसह घटना स्थळावरून पसार झाला. त्यानंतर मंडळ अधिकारी देशपांडे यांनी उपविभागीय अधिकारी शरद जावळे व तहसीलदार श्याम धमणे यांना घटनेचा वृत्तांत कळविला असता ते ही घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी रेती खाली झालेल्या जागेचा पंचनामा करून रेती जप्तीची कार्यवाही केली. मंडल अधिकारी देशपांडे यांनी पोलीस स्टेशनला याबाबत लिखित तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी उमेश पोद्दार (३८) याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे या अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर व तालुक्यात रेती तस्करीचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असून वदरहसतांना हाताशी धरून बिधास्तपणे रेतीची वाहतूक करण्यात येत आहे. रेती तस्करीच्या माध्यमातून अमाप पैसे मिळत असल्याने पुष्कळसे महारथी या धंद्यात उतरले आहे. प्रशासनाला न जुमानता त्यांच्यावर कुरघोडी करत ते आपला डाव साधत आहे. माहितीच्या आधारे रेती तस्करांवर कार्यवाही करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांनाच दमदाटी करण्या इतपत या तस्करांची मजल गेली असल्याने त्यांच्या मुसक्या आवरणे आता गरजेचे झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share