WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

तालुक्यातील उमरी येथील दोन्ही महिलांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

पांढरकवडा येथील आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आलेल्या वणी तालुक्यातील उमरी गावातील त्या दोन महिलांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग सोबतच वनीकर जनतेच्याही जिवात जीव आला आहे.

तालुक्यातील पेटूर लगत असलेल्या उमरी गावामध्ये मुंबई वरून परतलेल्या एका कुटुंबाला तेथीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये कॉरंटाईन करण्यात आले. यातील एका महिलेला कोरोना सदृष्य तीव्र लक्षणे आढळल्याने गावातील उपसरपंच राजेश सिडाम यांनी याबाबत आरोग्य विभागाला कळविले.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत वेळ न घालवता त्या कुटुंबातील दोन महिलांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने पांढरकवडा येथील आयसोलेशन विभागात पाठवले तर दोन व्यक्तींना पळसोनी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवले. एका महिलेची प्रकृती गंभीर तर दुसऱ्या महिलेला अतिसौम्य लक्षणे होती. या दोघींचेही कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. उमरी गावातील एक तरुणी मुंबई येथे खाजगी क्षेत्रात काम करत होती. काही दिवसांनी तिने आपल्या मोठ्या बहिणीलाही तेथे बोलावून घेतले. वडील व दोघे मायलेक असे तिघे जण तिच्याकडे मुंबईला राहायला गेले. परंतु कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्याने शहर व तालुक्यातील शेकडो नागरिक राज्यातील विविध ठिकाणी अडकल्या गेले. लॉकडाऊन काळात असंख्य नागरिकांचे रोजगार हिरावल्याने त्यांची आपापल्या गावाकडे जाण्याची धडपड सुरु झाली. अशातच शासनाने राज्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्यास मंजुरी देत त्यांच्यासाठी वाहतुकीचीही व्यवस्था केली. त्यामुळे परठिकाणी अडकलेल्या नागरिकांचे जत्थे मिळेल त्या साधनाने गावाच्या दिशेने निघाले. मुंबईमध्ये अडकलेलं हे कुटुंबही कसबसं उमरी या गावात पोहचलं. परंतु त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषद शाळेत कॉरंटाईन केल्या गेलं. यादरम्यान कॉरंटाईन असलेल्या चौघांपैकी एका महिलेला उलटी होऊन ताप व खोकल्याची तीव्र लक्षणे दिसल्याने आरोग्य पथकाला बोलावण्यात आले. त्यातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सदर महिलेला व सौम्य लक्षणं असलेल्या तिच्या बहिणीला पांढरकवडा येथील आयसोलेशन विभागात पाठवले तर दोघ्या आजे नातांना पळसोनी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. त्यांना कोरोना झाल्याच्या धास्तीनं संपूर्ण गावचं लॉकडाऊन झालं. गावात कुणाला प्रवेशही नाकारण्यात आला. कोरोना संशयित सापडल्याची अफवा शहरात वणव्यासारखी पसरली. त्यामुळे शहरवासियांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या दोघींना खरच कोरोना तर झाला नाही ना ही एकच चर्चा शहरात रंगली होती. उमरी गाववासीयांचा तर जीव टांगणीला लागला होता. अखेर त्या दोन्ही महिलांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांच्याच जिवात जीव आला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share