WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दुकानांची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे व्हाट्सअँप व फेसबुक वर आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्या विषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी टिप्पणी करणाऱ्यांच्या दुकानांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वॉट्सअँप व फेसबुक वर आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्या विषयी खेदजनक मजकूर लिहिल्या प्रकरणी २५ मे ला विवेक पांडे व सतीश पिंपळे यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले . मुख्यमंत्रांविषयी अतिशय गंभीर स्वरूपाची टिप्पणी करण्यात आल्याचा राग अनावर झाल्याने आज २६ मे ला सकाळी १० वाजताच्या सुमारास माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह शिवसैनिकांनी विवेक पांडे यांचे जटाशंकर चौकातील पांडे मोबाईल शॉपी या व्यावसायिक प्रतिष्ठानाला लक्ष करीत दुकानातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तसेच सतीश पिंपळे यांच्या मालकीचे लक्ष्मी नगर नांदेपेरा रोड येथील रसवंतीगृहाची मोडतोड करून त्यातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्या गेली. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याने शिवसैनिकांचा एक जत्था आक्रमक होऊन निंदाजनक मजकूर टाकलेल्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर तुटून पडला यात पांडे मोबाईल शॉपी मधील महागड्या वस्तूंची तोडफोड झाल्याने त्यांचे दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यावसायिक कल्याण शंकरराव पांडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून माजी आमदार विश्वास नांदेकर, तालुका प्रमुख रवी बोढेकर यांच्यासह आदेश पोंगारे, विक्रांत चचडा, अजय नागपुरे, बंटी उर्फ निखिल येरणे, संतोष वऱ्हाटे, संजय आवारी, चंद्रकांत घुग्गुल, महेश चौधरी यांच्यावर भादवी च्या कलम 147, 148, 149, 452, 427, 188, 269, 294, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निखिल फटिंग करीत आहे. त्याचप्रमाणे सतीश निळकंठराव पिंपळे यांच्या रसवंतीसह त्यातील साहित्याची तोडफोड झाल्याने त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.सतीश पिंपळे यांच्या तक्रारीनुसार माजी आमदार विश्वास नांदेकर, रवी बोढेकर, विक्रांत चचडा, अजय नागपुरे, बंटी उर्फ निखिल येरणे यांच्या सह अनोळखी आठ ते दहा जणांनी तोडफोड केली असुन त्यांच्यावर भादवी कलम 147, 148, 149, 452, 427, 188, 269, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बाजड करीत आहे. गुन्ह्याची नोंद झाल्या नंतर सर्वच शिवसैनिकांना न्यायालयात हजर केले असता न्यायालया कडून त्यांना जामीन मिळाला आहे.

साधुंच्या झालेल्या हत्यांच्या घटनांचे खापर राज्य शासनावर फोडून शासनकर्त्यांवर अतिशय खेदजनक टिप्पणी केल्याने शहरात आज हे रणकंदन घडलं असून अश्या खालच्या पातळीच्या टिका टिपणींनी सामाजिक व राजकीय अराजकता निर्माण होऊन शहरातील शांतता भंग होऊ शकते. त्यामुळे राजकीय विषय हाताळताना मर्यादेपलीकडच्या टिपण्या होणार नाही याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे. शांतीप्रिय नागरिकांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात राजकीय व सामाजिक सलोखा पूर्वीसारखाच नांदावा हीच येथील शहरवासीयांची अपेक्षा आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share