WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

बहुतांश व्यवसाय व मजुरांची कामे सुरु झाल्याने शहरातील निर्मनुष्य रस्ते गजबजले

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला असला तरी त्यातील निर्बंध शिथिल करण्यात आल्याने शहरातील जवळपास सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरु झाली असून मजूर वर्गांचीही कामे सुरु झाल्याने शहरातील निर्मनुष्य रस्ते पुन्हा एकदा गजबजून उठले आहेत. सर्वच व्यवसायांना वेळेचे बंधन देण्यात आल्याने व्यवसायिकांबरोबरच मजुरांचीही वेळेत पोहोचण्या करीता रस्त्यांवरून एकच तगमग पाहायला मिळत आहे. दिड महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी बंद मधेच गेल्याने नैराश्याने ग्रासलेल्या व्यावसायिक व मजुरांमध्ये कामधंदे सुरु झाल्याने नवचैतन्य निर्माण झाले आहे. बाजारपेठेत उसळणारी गर्दी व वाढलेल्या वाहनांच्या रांगा पाहून “इथले कोरोनाचे भय संपले” असेच भासत आहे. एकवेळी अवाढव्य वाटणारे शहरातील रस्ते आता जागोजागी उभ्या असणाऱ्या वाहनांनी अरुंद वाटत आहे. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्याने संकुचित झालेल्या रस्त्यांवरून वाहतुकीची कोंडी होत असून अंतर्गत रस्त्यांवर नेहमी जाम लागत आहे. फळ भाजी विक्रेत्यांनीही आपली दुकाने मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर थाटल्याने ग्राहकही रस्त्यांवरच गाड्या लावून फळ भाज्या खरेदी करीत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहे. भाजी विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागा वेळोवेळी बदलत असून त्यांना हक्काची जागा मिळाल्यास त्यांचे व शहरवासियांचेही प्रश्न सुटतील. शहरात सोशल डीस्टंसीनच्या नियमांना तर पूर्ण विरामचं लागला आहे. कपड्यांची दुकाने असो व चिकन मटणची दुकाने नागरिक गळाभेटी होतील इतक्या जवळून जातात व अगदी खेटून ऊभी राहतात. बाजारपेठ सुरु असेपर्यंत लॉकडाऊन लागू असल्याचे अंशताही जाणवत नाही. हस्तांदोलन व जवळीक साधतांना अनेक जण याठिकाणी पाहायला मिळत आहे. काही महाभाग तर मास्क न लावताही रस्त्यानी फिरतांना दिसतात. तर काही दुकानांमध्ये मास्क न लावताच व्यवहार होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. लग्न समारंभामध्येही ५० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहात असून त्याठिकाणी सोशल डीस्टंसीन व मास्क लावलेले खूप कमी लोक पाहायला मिळतात. कोणतीही खबरदारी न घेता गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांमध्ये बाहेरून आलेली व्यक्ती मिसळल्यास व त्यापासून धोका निर्माण झाल्यास त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. तेंव्हा गर्दीच्या ठिकाणी वावरतांना नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असून प्रशासनेही त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दुसरीकडे मजुरांच्या हाताला कामे मिळाल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न काही प्रमाणात मिटले आहेत. रोजगाराने तुटलेल्या प्रत्येक व्यक्तीचा रोजगार उपलब्धतेमुळे आत्मविश्वास बळावला आहे. घरांची बांधकामे, कलरपेन्टिंग, इलेकट्रीक फिटिंग व दुरुस्तीची कामे, फर्निचरची कामे, घरातील स्टाईल लावणाऱ्या कारागिरांची कामे, नळ कारागिरांची कामे सुरु झल्याने अनेक मजुरांच्या व कारागिरांच्या हाताला कामे मिळाली आहेत. त्यामुळे मजूरवर्गांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. रेती घाटांचा लिलाव न झाल्याने नवीन बांधकामे सुरु होऊ शकली नाही. जुनी रखडलेली व रेती उपलब्ध असणाऱ्यांचीच बांधकामे सुरु आहेत. रेती घाट बंद असल्याने वाळू माफियांकडून ज्यादा दराने रेती घेणे परवडणारे नसल्याने बहुतांश ठेकेदार व मालकांनी बांधकामे बंदच ठेवणे पसंद केले आहे. त्यामुळे पाहिजे तसा रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. रेती घाटाचे लिलाव न झाल्याने रेती तस्करीला उधाण आले असून शासनाचाही कोट्यावधींचा महसूल बुडाला आहे. घाटांचे लिलाव लवकर न झाल्यास समोर पावसाळ्यात रेती मिळणे दुरापास्त होईल व सुरु असलेली बांधकामे ही बंद पडतील. त्यामुळे परत रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल व रोजगारामुळे आधीच डबघाईस आलेल्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल.तेंव्हा पावसाळ्यात कामे सुरु राहावी याकरिता आधीच नियोजन करावे लागणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share