WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सतत होणाऱ्या आत्महत्यांनी मारेगाव तालुका हादरला

Image

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-

कोरोना नावाचं संकट जीवावर असं उलटलं की भीतीच्या सावटात आयुष्याची वाट लागली. संचारबंधित रोजगाराच्या संधी लुप्त झाल्याने कुटुंब जगविण्याच्या विवंचनेत कुटुंबप्रमुखचं हतबल झाले व त्यांनी परिस्थिती समोर लोटांगण घालत जीवनापासूनच फारकत घेतल्याने उजाड झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या आकांताने गाव शिवारही सुन्न झाले. बिकट परिस्थितीशी कुटुंब झुंजत असतांना मनावर आघात झालेल्या तरुण वयातील मुलामुलींना कुटुंबाची उद्विग्नता पाहावाल्या न गेल्याने तसेच आपल्यामुळं कुटुंबावर आणखी बरडन येऊ नये या भावनेतून त्यांनी जड अंतःकरणाने जगाचा निरोप घेतला. शहरातून गावाच्या ओढीने आलेल्या तरुणाला अलगीकरणात ठेवण्यात आले होते. परंतु त्यांने जीवनापासूनच अलगीकरनाचा मार्ग स्वीकारत नेहमीकरिता स्वतःला मृत्यूच्या कॉरंटाईनमध्ये लोटून दिले. कोरोना काळातील जीवनाच्या संघर्षात मृत्यूला कवटाळल्याच्या एकामागून एक घडलेल्या घटनांनी मारेगाव तालुका हादरून गेला आहे. आत्महत्येची मालिकाच सुरु झाल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक कळा सोसणाऱ्या निष्पाप जीवांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. हाताला कामं नाहीत, कुटुंबाच पालनपोषण कसं करावं या विवंचनेत कुटुंब प्रामुखाणे त्याच लाचार हातांनी स्वतःच जीवन संपवलं. कुटुंबाची होत असलेली दयनीय अवस्था पाहून तीळतीळ तुटणाऱ्या कुटुंबातील तरुण सदस्यांनी पोशिंद्यावर स्वतःचा भार पडू नये म्हणून आत्महत्ये सारखा मार्ग निवडला. कुटुंबाचा आधारवड असलेल्या तरुणांनीही नैराश्यापोटी मृत्यूला कवटाळले. त्यामुळे लॉकडाऊनचे परिणाम व दुष्परिणाम यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. आत्महत्यांचा मार्ग स्वीकारून जीवनातून कायमची एक्झिट घेतलेल्या निष्पाप व्यक्तींमध्ये पायल गणपत धोबे (१७) रा. गौराळा, विजय प्रभाकर भोयर (२७) रा. पांढरकवडा, रोहित लाला दुधकोहळे (२३) रा. पिसगाव, गणेश आत्माराम रोगे (३५) रा. देवाळा, रामा विठ्ठल आत्राम (२५) रा. गौंडबुरांडा, हनुमंत रामराव आत्राम (६०) रा. सुर्ला, निळकंठ चिमणा भडके (६५) रा. धामणी, सुनील गोविंदा टेकाम (३५) रा. नरसाळा, यांचा समावेश असून यातील बहुतांश व्यक्तींनी गळफास घेऊन तर दोन व्यक्तींनी जलसमाधी घेतली. मे महिना हा आत्महत्येचा हॉसस्पॉट महिना ठरला असून एकाच महिन्यात आठ व्यक्तींनी आपले जीवन संपवले. जून महिन्याची सुरुवातही आत्महत्येनेच झाली असून 'डोल मछिंद्रा येथील १८ वर्षीय तरुणीने आर्थिक टंचाईत आजाराची भर पडल्याने कुटुंबावर तान पडू नये म्हणून स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले. अशा या एकामागून एक होत असलेल्या आत्महत्यांच्या मालिकांनी मारेगाव तालुक्याला चांगलेच हादरून सोडले आहे. जीवन जगण्याच्या शर्यतीत मृत्यू बाजी मारत असून मृत्यूची ही मालिका खंडित करण्या करीता कुटुंबाच्या काळजीपोटी खचलेल्या प्रत्येक जीवाला आधार देण्याची गरज असून त्याकरीता प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सामाजिक यंत्रणेनेही पुढाकार घेण्याची आवश्यक्ता आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share