WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

अरविंद बन्सोड मृत्यू प्रकरणाची चौकशी "सीबीआय " मार्फत करावी

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :- नागपूर शहरातील थडीपवनी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा झालेला मृत्यू संशयास्पद असून त्याच्या हत्येला आत्महत्येचे स्वरूप देऊन आरोपीला वाचविण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न करण्यात येत असून या प्रकरणाची एस.आय.टी. किंवा सी.बी.आय. मार्फत चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक शाखेतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

अरविंद जनार्दन बन्सोड (२८) असे या कार्यकर्त्याचे नाव असुन तो मूळचा नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथील रहिवासी आहे. २८ मे ला नागपूर शहरातील थडीपवनी येथील गॅस एजन्सीच्या पायऱ्यावर तो बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याच्या बाजूला कीटकनाशक द्रव्याची बाटली आढळून आल्याने प्रथम दर्शनी अरविंदने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे भासत होते. परंतु अरविंद आत्महत्या करूच शकत नाही त्याची सुनियोजित हत्या करण्यात आल्याची भूमिका त्याचे नातेवाईक व मित्रमंडळींनी घेतल्याने या मृत्यू प्रकरणाला वेगळेच वळण लागले. अरविंद हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता व सोबतच गोरगरीब जनतेची कामेही करायचा. या रागातूनच त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप अरविंदच्या निकटवर्तीयांकडून होत आहे. थडीपावनी येथील पंचायत समिती सदस्य मिथिलेश उर्फ मयूर उमरकर यांच्या सोबत झालेल्या वादातूनच अरविंद याची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी मिथिलेश उर्फ मयूर उमरकर यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पोलिसांकडून अरविंदची आत्महत्या दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. तेंव्हा अरविंद बन्सोड या कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्यामुळे सदर प्रकरणाची एस.आय.टी. किंवा सी.बी.आय. कडून चौकशी करण्यात यावी, ही मागणी वंचित बहुजन आघडीच्या स्थानिक शाखेतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शाखेचे मंगल तेलंग, कपिल मेश्राम, चेतन नागराळे, किशोर मून. गौतम जीवने, संतोष गेडाम, ईश्वर खोब्रागडे, उल्हास पेटकर आदींनी दिला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share