WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लॉकडाऊन ने झाली शेतकऱ्याची दैना, पेरणी तोंडावर आली तरी पाऊस वेळेत येईना !

ImageImageImage

:

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :- मृग नक्षत्राची चाहूल लागताच शेतीच्या मशागतीत लिन झालेल्या शेतकऱ्याला प्रतीक्षा असते ती पावसाच्या आगमनाची. सुनियोजित शेतीची सर्व कामे आटोपल्यानंतर बिजरोपणा करीता पावसाच्या सरींची चातकासारखी वाट पाहणारा शेतकरी नभातील काळ्या ढगांकडे टक लावून बघत असतो. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजरी लावल्याने यावर्षी पावसाचे वेळेत आगमन होईल असे सूतोवाच झाले असतांनाच निसर्ग चक्रीवादळानं आगेकूच करत असलेल्या पावसाची वाट रोखली. निसर्गाच्या लहरीपणात नेहमीच संकटात सापडत असलेला शेतकरी यावर्षी लॉकडाऊनमुळे दोहऱ्या संकटात सापडला आहे. हलकीशी झुळूक दाखवून नंतर बेमुद्दत दडी मारणाऱ्या पावसाला आधी हप्ता दीडहप्ता धो धो कोसळू देऊन नंतरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या. कारण यंदातरी अडचणीत तेरावा महिना निर्माण व्हायला नको.

संपूर्ण देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी नेहमीच आसमानी व सुलतानी संकटाशी झगडतांना दिसतो. यावर्षी तर त्यांच्या संकटाला पारावारच उरला नाही. कोरोना महामारी देशात अवतरली व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याची पूर्ती दैना झाली. शेतमालाला भाव नसल्याने व माल वाहुतुकीची सुविधा नसल्याने शेतमाल शेतातच सडला. तर काही शेतकऱ्यांनी शेतीतील माल विकूनही मजुरांची मजुरी व वाहतूक खर्चही निघत नसल्याच्या कारणाने उभ्या पिकांवर नागर फिरवला. फळांना बाजारपेठा न मिळाल्याने लाखो रुपयांची फळे बागेतच सडल्याने ती फेकावी लागली. नगदीचं उत्पन्न समजल्या जाणारा कापूसही घरातच पडून राहिला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सीसीआयने कापूस खरेदी सुरु केली पण नियोजना अभावी नाव नोंदणीत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. तास न तास रांगेत उभे राहूनही नाव नोंदणी न झाल्याने खरीप पिकांचा हंगाम तोंडावर येऊनही बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरात पडून आहे. काही शेतकऱ्यांनी पैशाची चुणूक भागविण्या करिता खाजगी बाजारात कमी दराने कापूस विकला. सीसीआयच्या कापूस खरेदीमध्येही ग्रेडरने शेतकऱ्यांची चांगलीच लूट केली. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेला कापूस ओला आहे, चांगला दर्जा नाही, कमी प्रतीचा आहे अशी कारणे सांगून सर्रास नाकारला गेला. मग शेतकऱ्यांनी नाईलाजाने हा कापूस व्यापाऱ्यांना पडल्या भावात विकल्यानंतर व्यापाऱ्यांकडून हाच कापूस कुण्या शेतकऱ्यांचा सातबारा वापरून सीसीआयला विकला गेला. हाच कापूस व्यापाऱ्यांकडून आल्यानंतर सीसीआयचे ग्रेडर डोळे लावून कापूस खरेदी करतात. यातून ग्रेडर व व्यापाऱ्यांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे समोर आले. त्यामुळे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी हे कोडं निर्माण झालं. रब्बी हंगाम अगदी जवळ येऊन ठेपला तरी पावणे दोन हजार शेतकरी चणा खरेदीच्या प्रतीक्षेत राहिले. नाफेडने मोजक्याच शेतकऱ्यांकडून चणा खरेदी केला. नंतर जागा उपलब्ध नसल्याच्या कारणावरून खरेदी थांबवल्या गेली. जागा उपलब्ध झाल्या नंतरच चणा खरेदी करण्यात येणार असल्याचे खरेदी विक्री संघाकडून सांगण्यात आल्याने २० हजार क्विंटल चणा विक्री अभावी शेतकऱ्यांच्या घरातच पडून राहिला. केंद्र शासनाकडून यंदा उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात येईल या अपेक्षेत शेतकरी होते. परंतु शासनाकडून शेतपिकांच्या हमीभावात शेतकऱ्यांचे बोळवण केल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटल्या. सोयाबीन बियाण्यांच्या कुत्रिम टंचाईनेही शेतकरी चांगलेच हवालदिल झाले. सोयाबीन बियाण्यांची कुत्रिम टंचाई दाखवून वितरकांनी सोयाबीन बियाण्यांच्या ३० किलोच्या बॅगवर ५०० ते ७०० रुपये जास्तीचे घेतले. शेतकऱ्यांकडून साडेतीन हजार रुपये दराने घेतल्या गेलेले सोयाबीन आता त्यांनाच बियाण्याच्या रूपाने सात ते साडे नऊ हजार रुपये दराने विकल्या जात आहे. याबाबत प्रशासनाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे पेरण्या संदर्भात मार्गदर्शन केले. कृषी विभागाने राबविलेल्या मोहिमेतून बियाण्यांची उगवण क्षमता ७० टक्के असेल तर ३० किलो, ६५ टक्के असेल तर ३३ किलो आणि ६० टक्के असेल तर ३६ किलो बियाणे वापरण्याचा सल्ला दिल्या गेला. पेरण्या तोंडावर आल्या असतांना कापूस तूर व चण्याचे चुकारे अडकले आहेत. शासकीय हमी केंद्रावर कापूस, तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली गेली. नाफेडच्या नियमानुसार खरेदी झालेला शेतमाल केंद्र शासनाच्या गोदामात पोहचला तरच त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते होतात. परंतु जिल्ह्याला कित्येक दिवस गोदामच मिळाले नसल्याने शेतमालाचे चुकारे अडकले. नंतर धामणगावचे गोदाम उपलब्ध करून दिल्याने त्याठिकाणी खरेदी झालेला शेतमाल ठेवल्या जाणार असून त्यानंतर शेजाऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याचे पैसे वळते होणार आहे. पिकवाढीसाठी आवश्यक असणारे युरिया खंतही वेळेवर उपलब्ध न झाल्याने शेकऱ्यांची तारांबळ उडाली. तालुक्यातील शेतकरी युरिया खत खरेदी करण्या करीता धडपडतांना दिसत होते. वणी तालुक्यासाठी ४०० मेट्रिक टन युरिया खताची गरज असतांना निम्म्यापेक्षाही कमी खत वणी तालुक्याला मिळाले. लॉकडाऊनमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाल्याने व पुरवठा एजन्सीने वाहतुकीस नकार दिल्याने तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला. धामणगाव येथे रॅक पॉईंट देण्यात आल्याने कृषी विक्रेते स्वतःचे वाहन व मनुष्यबळ धामणगाव येथे पाठवून खताची आयात करित असल्याने २६६ रुपये किमतीची युरिया बॅग ३०० रुपयांपेक्षा अधिक किंमत आकारून विकण्यात आली. त्यामुळे यावर्षी शेतीउपयोगी प्रत्येक वस्तू शेतकऱ्यांना महागड्या किंमतीतच घ्याव्या लागल्या. या सुलतानी संकटाची झळ सोसत असलेल्या शेतकऱ्यांना पिक कर्जाकरिताही व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. बँकांच्या उदासीन धोरणांमुळे कर्ज वाटप होत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहे. याची दाखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेत कर्ज वितरणाबाबत बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सर्वांवर मत करीत शेतकरी पेरणी करीता सज्ज झाला असून आता त्याला प्रतीक्षा लागली आहे ती धो धो बरसणाऱ्या पावसाची.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share