WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घोन्सा खदानीतील विद्युत पॉवर केबल चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक

Image

प्रतिनिधी प्रशांत चंदनखेडे वणी :- वेकोलिच्या घोन्सा खदाणीमधून तांबायुक्त विद्युत पॉवर केबल चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संदीप उर्फ चना देवानंद राठोड (२५) रा. रंगनाथ नगर व अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फुर (५७) रा. रजा नगर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याजवळून एकंदरीत ६० हजार रुपये किमतीचे ४६ किलो वजनाचे तांब्याच्या तारांचे बंडल जप्त करण्यात आले आहे.

वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या घोन्सा या खुल्या खदाणीतून हाय पॉवर विद्युत केबल चोरीला गेल्याची घटना १२ जूनच्या रात्री घडली. १३ जूनला खदानीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अतुल दिलीप चेंदे (३०) यांनी विद्युत केबल चोरीला गेल्याची तक्रार वणी पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून रंगनाथ नगर येथे राहणाऱ्या संदीप उर्फ चना देविदास राठोड याला अटक केली असता त्याने विद्युत केबल चोरल्याचे कबुल करत त्यातील तांब्याचे तार काढून वर्धमान भंगार दुकानदाराला विकल्याचे सांगितले. त्याच्या कबुली जबाबानुसार भंगार दुकानाची झडती घेतली असता त्याठिकाणी तांब्याच्या ताराचा गुंडाळा आढळून आल्याने भंगार दुकानदार अब्दुल सत्तार अब्दुल गफ्फुर याला ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींवर भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुंभारखनी व घोन्सा या खदानी नेहमी चोरट्यांच्या रडारावर राहिल्या आहेत. या खदानींमध्ये पडून असलेले आवश्यक व अनावश्यक लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणात चोरटयांनी लंपास केले आहे. कधी वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांना धमकावून तर कधी त्यांच्यावर वर्चस्व गाजवून लाखोंच्या लोखंडी साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. कोळशाच्या उत्पन्ना अभावी काही काळ या खदानी बंद असल्याने रात्र पाळीत वेकोलिचे मोजकेच सुरक्षा रक्षक ड्युटीवर राहत असल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत होते. आधी दबक्या पावलांनी होणाऱ्या चोऱ्या नंतर निर्ढावून केल्या जाऊ लागल्याने वेकोलि प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी खदानीची सुरक्षा व्यवस्था वाढवून पोलिसांमध्येही तक्रारी केल्याने पोलिसांनी सापळे रचून वाहनांसह चोरट्यांना अटक केल्याने चोरट्यांचे धाबे दणाणले व खदाणीतील चोऱ्यांच्या घटनांवर अंकुश लागला. खदानींमधून होणाऱ्या साहित्यांच्या चोरींची प्रकरणे थंडावली असतांनाच परत याच खदानीमधून तांबायुक्त विद्युत पॉवर केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. खुल्या खदानींमध्ये प्रत्येक ठिकाणी विद्युत खांब लावता येत नसल्याने या पॉवर केबलच्या साहाय्याने आवश्यक त्या ठिकाणी विद्युत प्रवाह घेतल्या जातो. खदानींमधले पाणी उपसण्याकरिता हाय पॉवर मोटारपंपांना विद्युत जोडणीकरिता हा केबल वापरल्या जातो. आवश्यक त्याठिकाणी या केबलच्या माध्यमातून वीज पुरविली जात असल्याने खदानींमध्ये अशा प्रकारचे पॉवर केबल स्टॊक करून ठेवल्या जातात. हे केबल तांबायुक्त असल्याने ते विकून चांगली रक्कम मिळेल या लालसेतून चोरट्याने ते लंपास करून त्याला जाळून त्यातून निघालेले तांब्याचे तार भंगार दुकानदाराला विकले. महागडा पॉवर केबल चोरी झाल्याने वेकोलि प्रशासनाने सुरक्षा रक्षका मार्फत वणी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. तक्रार दाखल होताच मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात फार्मात असलेल्या पोलिसांनी या केबल चोरी प्रकरणाचा तपासही तेवढ्याच तत्परतेने व जलद गतीने करून चोरी करणाऱ्या व चोरीचा माल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली. त्यांच्यापासून अंदाजे ६० हजार रुपये किमतीचा केबल मधून काढून विकलेला तांब्याचा तार जप्त केला. सादर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक व पो.नि. वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, गजानन भांदक्कर, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार, अमित पोयाम, यांनी केली. पुढील तपस पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share