कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वार्ड क्रमांक ३ मधील तो परिसर सील, या भागाकडे येणारे सर्वच रस्ते व सीमा बंद
प्रशांत चंदनखेडे वणी :-
मुंबई येथून शहरात आलेल्या एका कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील गजबजलेले रस्ते आज ओस पडल्यागत जाणवत होते. पॉझिटिव्ह रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरु असून त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना पळसोनी येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वाब घेऊन कोरोना लॅब मध्ये तपासणी करीता पाठवण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली आहे.
वणी वरोरा मार्गावरील महावीर भवनासमोर असलेल्या निवासस्थानी ११ जूनला मुंबईवरून एक कुटुंब आले. त्यातील दोन व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने ते तपासणी करिता नागपूरला गेले. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच प्रशासनाने २० जूनला सायंकाळच्या सुमारास महावीर भावनासमोरील त्यांचे घर गाठत घरातील ९ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरण कक्षात पाठविण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेऊन आज २१ जूनला आणखी ५ व्यक्तींना विलीगीकरण कक्षात हलविले असल्याने एकूण १४ जणांचे स्वाब घेऊन ते कोरोना लॅब मध्ये तपासणी करीता पाठविण्यात आले आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींच्या घरासभोतालचा १५० मीटर परिसर सील करण्यात आला असून परिसरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य विभागांतर्गत आशा सेविकांतर्फे सकाळ सायंकाळ स्कॅनिंग करण्यात येत आहे. राज्य, विदर्भ व जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊनही तीन महिने कोरोनामुक्त राहिलेल्या वणी शहरात कोरणाचा शिरकाव झाल्याने एकीकडे शहरवासी धास्तावले आहे तर दुसरीकडे प्रशासन गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने नागरिकही निश्चिंत होऊन शहरात वावरायचे. शासनाचे उपाययोजनात्मक नियमांनाही सहजतेने घ्यायचे. परंतु आता अधिकृतरित्या कोरोना रुग्ण आढळल्याने मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी प्रशासनातर्फे केली जाणार आहे. त्यानुसार कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वॉर्ड क्रमांक ३ (साई दरबार व शांतिपार्क परिसर) हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागाला पूर्णपणे सील करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत या भागातील अवागमन बंद राहणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्या करिता ही उपाय योजना आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी सांगितले आहे. यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीची बॉण्ड्री व डीपी रोड, तुकडोजी महाराज सभागृहा कडील मोहितकार व वऱ्हाटे यांचे घर, महादेव मोटर्स समोरील रास्ता व गौरकार यांचे घर, धवस ,दीपक छाजेड व गुप्ता यांचे घर, या भागातील सर्व सीमा व रस्ते पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक शासनाच्या सेवेतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनाच याठिकाणी अत्यावश्यक सेवा, सुविधा पुरविण्यास जाण्याची मुभा राहील. या व्यतरिक्त कोणत्याही सामान्य नागरिकास याठिकाणी जाण्या येण्यास पूर्णतः बंदी असेल. या ठिकाणी आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणेने उचललेले हे उपाय योजनात्मक पाऊल असून जनतेने शासनाने सुचविलेल्या कोरोना प्रतिबंधक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हानही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.