शहरात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या आता तीन झाली !
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- शहरातील दोन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असतांनाच त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून ऍक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. या सर्व रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरु असून आतापर्यंत ३६ व्यक्तींना पळसोनी येथील संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे. तसेच या व्यक्तींशी जवळून संपर्क आलेल्या व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरु आहे.
वणी वरोरा रोडवरील महावीर भावनासमोरील निवासस्थानातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णाच्या घरासभोतालचा १५० मीटर परिसर सील करण्याबरोबरच वार्ड क्र. ३ मधील साई दरबार व शांतिपार्क परिसर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून या परिसराच्या सर्व सीमा प्रशासनाने सील केल्या आहे. पुढील आदेशापर्यंत याठिकाणचे अवागमन बंद करण्यात आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरातील रहिवासी असलेल्या प्रत्येक नागरिकांचे आरोग्य विभागाकडून आशा सेविकांमार्फत सकाळ सायंकाळ थर्मल स्क्यानिंग करण्यात येत आहे. कोरोना बाधित व्यक्तींच्या वा त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या संपर्कातआलेल्या ३६ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले असून इतरही व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात आहे.अशातच आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. शहरवासियांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी अकारणघराबाहेर बाहेर पडणे बंद केले आहे. मास्क न लावता कोरोनाची साथ निवळल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्यांच्या तोंडावरही आता मास्क परत आले आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची खबरदारी घेतांना दिसत आहे. रविवारी बाजाराच्या दिवशीही शहरात वर्दळ जाणवत नव्हती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरातील प्रत्येक रस्त्यांवर ओसंडून वाहणारा जनप्रवाह शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे कळताच काही अंशी संथ झाला आहे. शहर कोरोनमुक्त असल्याने शहरवासीही भीतिमुक्त होते. उपाय योजनांचे नियमही ते सहजतेने घेत होते. परंतु आता अधिकृतपणे कोरोना रुग्ण आघळल्याने प्रशासनही आता नियमांची कठोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे जनतेलाही सावधगिरीने राहण्याबरोबरच शासनाच्या कोरोना संदर्भातील प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. तेंव्हा नागरिकांनी भयभीत न होता सावधगिरी बाळगून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.