शहरातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली पाच !


प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-
शहरात मुंबईवरून आलेल्या दोन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आणखी दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता पाच झाली आहे. यातील तीन रुग्ण नागपूर येथे उपचार घेत असून दोन व्यक्ती वणी येथे संस्थात्मक विलीगीकरणात आहे.
शहरात महावीर भावनासमोरील निवासस्थानी मुंबईवरून आलेल्या एका कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या नंतर त्यांच्या परिवारातील व परिचयातील लोकांचा शोध घेऊन त्यांचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. २० जून पासून २३ जूनपर्यंत ३ रुग्णांची भर पडली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात असून आतापर्यंत ५८ व्यक्तींना विलगीकरणात हलविण्यात आले असून ४२ जणांचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १० निगेटिव्ह तर दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. रुंगणाची संख्या वाढीस लागल्याने प्रशासनाबरोबरच शहरवासीही चिंतेत पडले आहेत. तपासणी करीता पाठविण्यात आलेल्या स्वाबचे आणखी रिपोर्ट येणे बाकी असून रुग्णांच्या संख्येत आणखी किती वाढ होईल या चिंतेने आता सर्वांनाच ग्रासले आहे. तरी प्रशासन ही साखळी तोडण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करीत असून शहरवासियांनीही सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.