ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरु झाले रोडच्या दुरुस्तीचे काम


प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-
शहरातील वार्ड क्रमांक २ मधील विठ्ठलवाडी परिसरातून एस.बी. लॉन जवळून वणी वरोरा रोडवर निघणाऱ्या मुख्य रस्त्याचे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून याकरिता संपूर्ण रस्ता खोदून काढण्यात आल्याने पावसामुळे तयार झालेल्या चिखलातून मार्ग काढतांना नागरिकांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चिखलमय रस्त्यावरून दुचाकीने जातांना घसरून पडून अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच वर्षापूर्वी या रोडचे डांबरीकरन करण्यात आले होते.रोडवर जागोजागी खड्डे पडल्याने या रोडच्या दुरुस्तीकरणाची मागणी सुरु होती. लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेली खनिज निधी अंतर्गत करण्यात येणारी रोडची कामे ऐन पावसाळा लागतांना सुरु झाल्याने मार्गक्रमण करतांना नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यातल्यात्यात शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संबंधित परिसराकडे जाणारे मार्ग सील करण्यात आल्याने विठ्ठलवाडी, गौरकार कॉलोनी व रेल्वे क्वार्टर कडे जाणारे पर्यायी रस्तेही बंद झाल्याने नागरिकांचा मनःस्ताप वाढला आहे.
शहरातील विठ्ठलवाडी परिसरातून मुख्य बाजारात जाणारा हाच एकमेव सोयीचा रस्ता आहे. गौरकार कॉलोनी व रेल्वे क्वार्टर परिसरातील नागरिकांच्या अवागमनाचा हाच एकमेव सोयीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. छोटी मोठी दैनंदिन गरजेची दुकानेही याच रस्त्यावर आहे. या परिसरात शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग मोट्या प्रमाणात वास्तव्याला आहे. दररोज कामाच्या ठिकाणी वेळेत जाण्याच्या लगबगीत असणाऱ्या या वर्गाचे येण्या जाण्याचे रुटीन बिघडले असून गल्लीबोळातून मार्ग शोधून मुख्य रास्ता गाठावा लागत असल्याने त्यांचा जास्तीचा वेळ खर्ची जातो आहे. पाऊस पडला की काम बंद व नंतर पावसामुळे झालेल्या चिखलानेही काम बंद राहत असल्याने आता हा रोड तयार होण्याकरिता नेमका किती कालावधी लागतो हे सांगणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे रोडच्या दुरुस्तीकरणाची कामे बंद असल्याने सध्यास्थितित असलेल्या रोडवरही पावसाळ्याचे दिवस निघाले असते. पावसाळा संपल्यानंतरही रोडचे काम सुरु करता आले असते. अशा प्रतिक्रिया आता विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांमधून उमटत आहे. खनिज विकास निधीअंतर्गत मंजूर झालेल्या या रस्त्याचे दुरुस्तीकरणाचे काम सुरु असून विठ्ठलवाडी परिसरातून मुख्य बाजारपेठेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरु करण्यात आल्याने पावसामुळे कामामध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याने कामाचा वेग मंदावला आहे. शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वच पर्यायी मार्ग बंद झाल्याने या परिसरातील लोकांना ड्युटी,बाजार व दवाखान्यामध्ये जाण्याकरिता याच चिखलमय रस्त्यावरून मार्ग काढावा लागत असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाने उसंत दिल्यानंतर दिवसरात्र काम सुरु ठेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करून रस्ता रहदारीकरिता मोकळा करून देण्याची मागणी या परिसरातील रहिवासीयांकडून केल्या जात आहे.