WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करा ; सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली मागणी

Image

प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-

देश व राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोरोना या साथीच्या रोगापासून तीन महिने बचावात्मक भूमिका घेतलेल्या वणी शहराला अखेर मुंबई कनेक्शन नडल्याने तेथून कोरोना घेऊन आलेल्या एका कुटुंबाने शहरात कोरोना संक्रमणाची साखळी तयार केली. मोकळ्या वातावरणात वावरणारी जनता भीतीच्या सावटाखाली आली. कोरोनाच्या धास्तीने जनजीवन विस्कळीत झाले. भयमुक्त वातावरणात खुला श्वास घेणाऱ्या शहरातील नागरिकांच्या मनात कोरोनाचा धाक निर्माण झाल्याने शहराचा पार कोंडवाडा झाला आहे. कोरोनाच्या दूषित वातावरणात विरंगुळ्यासाठीही कुण्या परिचितांकडे जाण्यास शहरवासी धजावत नसून आठवड्याभरापूर्वी देश व जिल्ह्याची रुग्णसंख्या जाणून घेणाऱ्या जनतेवर आता काळजीपोटी स्वतःच्याच शहरातील कोरोना विषयक अपडेट जाणून घेण्याची वेळ आली आहे. २० तारखेपासून सुरु झालेली कोरोना बाधितांची आकडेवारी २४ तारखेपर्यंत ६ वर पोहोचली आहे. यादरम्यान शहरात प्रतिष्ठितांच्या झालेल्या मेजवण्याही कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरते कि काय या ही चिंतेत शहरवासियांचा जीव सुकत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळात वेळेचे बंधन व नियमांचे पालन न करून मेजवान्यांचे आयोजन करून शासनाच्या धोरणाला बगल देणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. दिवसाआड कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात मुबईवरून आलेल्या कुटुंबातील त्या व्यक्ती कोरोना घेऊन आल्याने येथे कोरोना या साथीच्या रोगाने आपले पाय रोवले. हळूहळू संक्रमण वाढत चालल्याने प्रत्येक दिवस कोरोनाच्या दहशतीत उगवत आहे. याच काळात शहरात पार्ट्यांचे आयोजन झाल्याने भीतीचे सावट आणखीनच गडद झाले आहे. राज्यात लॉकडाऊनचा काळ सुरु असून वेळेचेही बंधन देण्यात आले आहे. लग्नसमारंभ व अंत्यविधी करीता नियमांच्या अधीन राहून मर्यादित लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली असली तरी इतर कोणत्याही सामूहिक कार्यक्रमास मुभा देण्यात आलेली नाही. तरी सुद्धा शहरात मेजवान्या देण्यात आल्याने नियमांचे सऱ्हास उल्लंघन झाल्याच्या प्रतिक्रिया शहरातून उमटत असून यानिमित्ताने एकत्रित येणाऱ्यांमुळे कोरोना संक्रमण वाढण्यास वाव मिळतो. त्यामुळे कोरोनाचे बीज रोवण्यास कारणीभूत असणारे व मेजवान्या देऊन कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण करणारे यांना याकाळात योग्य ती खबरदारी न घेता नियमांच्या विपरीत वागल्याने त्यांच्यावर कोव्हीड-१९ अधनियमांतर्गत कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अनिल घाटे, अजय धोबे, दिलीप भोयर, अनिल हेपत, रुपेश ठाकरे, असीम हुसेन, संदीप गोहोकर, अनिकेत चामट, दत्ता दोहे, नितीन तुराणकार, सागर जाधव, गौरव तातकोंडवार यांनी केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share