कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील २२ जणांना कोविड केंद्रात हलविले
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत असून आज आणखी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता सात झाली आहे. महिला रहात असलेल्या प्रभाग क्रमांक १० मधील सेवानगर परिसर सील करून त्याठिकाणी सॅनीटायझरची फवारणी करण्यात आली आहे. त्याव्यक्तीच्या संपर्कातील ९ व्यक्तींना आधीच इन्स्टिट्यूशन कॉरंटाईन करण्यात आले होते. आज आणखी त्या महिलेच्या संपर्कातील २२ व्यक्तींना (हायरिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे. काही व्यक्तींना (लोरीस्क} होम कॉरंटाईन केले असून संपर्कातील व्यक्तींचे शोधकार्य जलद गतीने सुरु आहे. संस्थात्मक विलीगीकरणात असलेल्या १७ लोकांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
दरम्यान आज जनतेच्या संमतीने सोमवार २९ जूनपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी रेस्टहाऊस येथे घेण्यात आलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय नेते व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवार पासून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने पाच दिवसांपर्यंत बंद राहणार असून केवळ मेडिकल, दुधडेरी व कृषी केंद्र हे सकाळी ७ ते १० या वेळेत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. १० वाजेनंतर जर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करायची झाल्यास ती घरपोच उपलब्ध करून देण्याकरिता लवकरच हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. रविवार २८ जून हा दिवस मोकळा असल्याने या दिवशी नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यास मोकळीक देण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी घेतला असून शहरात लोकांची चहलपहल न राहिल्यास प्रशासनालाही कोरोनाची साखळी तोडण्या करीता आवश्यक त्या उपाययोजना करता येईल. त्यामुळे जनता कर्फ्यूचे सर्वांनी पालन करून शहरात निर्माण झालेले कोरोनाचे संकट दूर करण्यास सहकार्य करण्याचे यावेळी आव्हान करण्यात आले.