चिखलगाव हद्दीत रेतीच्या ढिगाऱ्यावर आढळून आले मृत अर्भक
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :-
तालुक्यातील चिखलगाव हद्दीतील सदाशिव नगर येथे एका वाळूच्या ढिगाऱ्यावर मृत अर्भक आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून गावात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून त्याठिकाणचा पंचनामा केल्यानंतर मृत अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केल्या जात आहे.
शहरापासून जवळच असलेल्या चिखलगाव हद्दीतील सदाशिव नगर येथील नंदिनी बारच्या मागे असलेल्या हिवरकर यांच्या घराजवळील हनुमान मंदिराच्या खुल्या जागेतील रेतीच्या ढिगाऱ्यावर अंदाजे ५ ते ६ महिन्यांचे मृत अर्भक वाहन चालकाच्या दृष्टीस पडले.त्याने याबाबत आपल्या मालकाला कळविले. मालकाने उपसरपंच रांगणकर यांना हि घटना सांगितली असता त्यांनी थेट पोलिसांना मृत अर्भक आढळल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी घटना स्थळ गाठून त्याठिकाणचा पंचनामा करून मृत अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रेतीच्या ढिगाऱ्यावर अशा प्रकारे मृत अर्भक आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नानाविध चर्चांना पेव फुटले आहे. अनैतिक संबंधातून अशा प्रकारचे दुष्कृत्य घडले असावे हा संशय याठिकाणी व्यक्त होत असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.