शहरातील जनता कर्फ्यूला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, व्यापारी संघटनांनी दर्शविला पाठिंबा
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात आज २९ जूनपासून घोषित करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असून बोटावर मोजण्या इतक्या दुकानांव्यतेरिक्त शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन व्यावसायिकांनी जनता कर्फ्यूला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
जनता कर्फ्यू संदर्भात शहरात दोन वेगवेगळ्या बैठकी घेण्यात आल्या. पहिल्या बैठकीत आमदार, नगराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, व्यापारी संगठनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यावर एकमत होऊन २९ जूनपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सायंकाळी खासदार बाळू धानोरकर यांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन शहरातील कोणत्याही व्यावसायिकांवर बंद थोपवू नये अशा सूचना देतांनाच ज्यांना व्यवसाय सुरु ठेवायचे असतील त्यांनी व्यवसाय सुरु ठेवावे असे जाहीर केले. त्यानंतर आज २९ जूनला शहरातील बोटावर मोजण्या एवढीच दुकाने सुरु होती. तर संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेऊन व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दवाखाने, औषधी दुकाने, कृषी केंद्र याव्यतेरिक्त शहरातील छोटी मोठी मोजकीच दुकाने सुरु होती. शहरातील सुरु असलेल्या दुकानांपैकी विशेष आकर्षण ठरली ती बियरबार व दारू विक्रेत्यांची दुकाने. राज्याला महसूल उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असलेले बियरबार व वाईनशॉप आजही बऱ्यापैकी सुरु होते. जनतेने विधानसभा व लोकसभेवर निवडून पाठविलेल्या जनप्रतिनिधींनी जनता कर्फ्यू बाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने जनताही बुचकाळ्यात पडली आहे. कोरोनाच्या या काळात संपूर्ण राज्य उपाययोजनांवर भर देत असतांना छोट्याश्या या वणी शहरात लोकप्रतिनिधींमध्ये दुमत जाणवत असल्याने जनतेसह प्रशासनही विचारात पडले आहे. पाहता पाहता रुग्णाची संख्या सात वर पोहचली असून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची काळजी घेतांना व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतांना प्रशासनाची एकीकडे दमछाक होत आहे तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींचा तालमेल जुळत नसल्याने प्रशासनही विचारात पडले आहे.
शहरात आज टिळक चौकातील चार ते पाच हातगाडीवरील फळ विक्रेते, टिळक चौक ते विराणी फंक्शन हॉल रोडवरील मोबाईल शॉपी, फूट वेयर, ऑटोमोबाईल, अंड्याचे ठोक दुकान सुरु होते. तसेच इंदिराचौकातील बियरबार, सुजाता टॉकीज परिसरातील वाईन शॉप, तीन बियरबार, चिकनची दुकाने, टिळक चौक ते टागोर चौक रोडवरील स्टेशनरीजची दुकाने, फोटो स्टुडिओ, सलून, नांदेपेरा रोडवरील बियरबार व मॉल, वणी यवतमाळ रोडवरील ४ ते ५ बियरबार, देशी दारू दुकान, सिंधी कॉलनी परिसरातील बियरबार, गांधी चौकातील काही फ्रुट विक्रेते, किराणा दुकान, सुपरबाजार, दीपक टॉकीज परिसरातील बियरबार, वाघदरा जवळील देशी दारू दुकान या व्यतरिक्त शहरातील संपूर्ण बाजारपेठ जनता कर्फ्यूचे पालन करून बंद ठेवण्यात आली. काही व्यावसायिकांनी इतरांची दुकाने सुरु असल्याचे पाहून ११ वाजेनंतर दुकाने उघडली तर काहींनी ११ वाजता नंतर दुकाने बंद केली. केशकर्तनालये सुरु करण्यास शासनाने २८ जून पासून मंजुरात दिली असतांना केवळ कटिंग करण्याला मंजुरी मिळाल्याने नाराज असलेल्या केशकर्तकांनी २८ जूनला दुकाने बंदच ठेऊन शासनाच्या निर्णयाविषयी रोष व्यक्त केला. परंतु आज २९ जूनला शहरातील महाराष्ट्र बॅंकेसमोरील केशकर्तनालय सुरु झाल्याने केशकर्तकांनी तडजोड केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता सलून व्यावसायिकांचा पोटापाण्याचा तर नागरिकांचा डोक्याच्या केसांचा प्रश्न मिटला आहे.