पाच दिवसांचा जनता कर्फ्यू एकाच दिवसात करण्यात आला रद्द
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतांना या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन २७ जूनला रेष्टहाऊस येथे झालेल्या सर्वपक्षीय सभेत जनता कर्फ्यू पाळण्याचा घेण्यात आलेला निर्णय आज २९ जूनला आयोजित करण्यात आलेल्या सर्व पक्षीय सभेत रद्द करण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांचे हित जोपासत हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी यातील राज कारण काय आहे हे समजण्या पलीकडचे आहे. उस्त्फुर्त प्रतिसाद मिळूनही जनता कर्फ्यू का मागे घ्यावा लागला हा संशोधनाचा विषय बनला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू पाळल्या गेला. सर्वांची त्याला संमतीही मिळाली पण शहरात सर्वानुमते जाहीर करण्यात आलेला जणता कर्फ्यू प्रतिसाद मिळाल्या नंतरही मागे घ्यावा लागला ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
शहरात २० जून पासून २७ जून पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली. त्यामुळे प्रशासनाबरोबरच जनताही चिंतेत पडली. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्या करीता हर संभव प्रयत्न व उपाययोजना केल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घर पिंजून काढत संशयित व्यक्तींना कॉरंटाईन करून परिसरातील लोकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. आरोग्य विभागाने आशा सेविकांच्या माध्यमातून या सर्व उपाय योजना राबविल्या. प्रशासनाला प्रतिबंधित क्षेत्रात सेवा पुरवितांना नागरिकांच्या वर्दळीचा त्रास होऊ नये व वर्दळीतून कोरोनाचे संक्रमण वाढू नये या उदात्त हेतूने काही सुज्ञ नागरिकांनी एकत्रित येऊन कोरोनाची ही साखळी तोडण्या करिता जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर ही करण्यात आला. आज २९ जून पासून सुरु झालेल्या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसादही मिळाला. मग कुठे माशी शिंकली काय माहित एकाच दिवसांत हा कर्फ्यू रद्द करावा लागला. लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करून हा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी यातील गोम काही वेगळीच असल्याचे शहरात बोलले जात आहे. नहिलेपे दहिल्याची राजनीती याठिकाणी सुरु असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. कोरोना सारखे संवेदनशील विषय हाताळतांनाही राजनीती होत असेल तर त्याचे पडसाद नंतर सर्वांनाच भोगावे लागणार आहे. कोरोनाच्या या महामारीतून जणता अजूनही मुक्त झालेली नाही. या महामारीने रोजच कुणाचा न कुणाचा बळी जात आहे. अवघ्या विश्वाला हादरवून सोडणाऱ्या या महामारीला अगदी सहजतेनं घेणं म्हणजे स्वतःचं व इतरांचं जीवन धोक्यात घालण्यासारखं आहे. सर सलामत तर पगडी हजार, या विचारवंतांच्या विचारांशी नाळ जोडून कोरोना पासून दोन हात दूर राहण्याचा संकल्प केंव्हाही केलेला बरा. कोरोनाच्या काळातही नशा भागविण्याकरिता लांबचलांब रांगा लागत असल्याने या आजाराची काळजी मिटल्याचा प्रत्यय येतो. मद्यपींच्या या उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत दारू विक्रेते जास्तीत जास्त नफा कमविण्याचा प्रयत्न करतात. दारू साठी लागलेल्या रांगेत कोण कोणाच्या संपर्कातला असतो, याचीही खात्री नसते. त्यामुळे शहरातील वर्दळीवर काही काळ नियंत्रण राहावे व कोरोनाची निर्माण झालेली साखळी तुटावी याकरिता सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सर्वानुमते जनता कर्फ्यू पाळण्याचा घेण्यात आलेला निर्णय अखेर एका दिवसातच मागे घेण्यात आला. त्यामुळे जनताही संभ्रमात पडली आहे.