कोविड केंद्रातील ३२ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्णसंख्या सातवर कायम !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून संस्थात्मक विलीगीकरणात ठेऊन त्यांचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ११ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून ४६ व्यक्ती सध्यास्थितीत कोविड केयर सेंटरमध्ये आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचे शोध घेणे सुरु असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
शहरात २० जूनला दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढल्यानंतर अल्पावधीतच नातेसंबंधातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यांच्या जवळीक लोकांचे नमुने घेतले असता २३ जूनला आणखी संबंधातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर २४ जूनला दुकानात काम करणारा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर दोन दिवस एकही रुग्ण न आढळल्याने कोरोना नियंत्रणात आल्याचे वाटत असतांनाच २७ जूनला त्यांच्या कडे काम करणाऱ्याच एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली. २८ जून पासून आज ३० जून पर्यंत एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने प्रशासनाबरोबरच जनतेतही समाधान पाहायला मिळत आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ असून प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.