वेकोलिच्या नागपूर हेड क्वाटर येथून बदलून आलेले मुख्यमहाप्रबंधक कॉरंटाईन राहतील काय ?



प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक आर.के. सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागी नागपूर येथील वेकोलिच्या मुख्य कार्यालयातील आय .डी. झंक्यानी यांनी कार्यभार स्वीकारला असून येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी तीन खदानींची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे समजते. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या नागपूर जिल्ह्यातून वणी येथे कार्यान्वित होण्याआधी स्थानिक आरोग्य विभागाला कळवून १४ दिवस कॉरंटाईन राहणे बंधनकारक असतांना महाप्रबंधकांनी वेकोलिच्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खदानींचा दौरा केल्याने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्यमहाप्रबंधक आर.के. सिंग यांच्या एकूणच वादग्रस्त कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडट्टीवार यांनी वेकोलि प्रशासनाकडे त्यांच्या अकर्तव्यदक्षते बद्दल तक्रारी केल्याने त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नागपूर येथील वेकोलिच्या मुख्य कार्यालयातील आय .डी. झंक्यानी यांची नियुक्ती झाली. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या नागपूर शहरातून वणीला आल्यानंतर येथील आरोग्य विभागाशी संपर्क साधून खबरदारीचा भाग म्हणून १४ दिवस कॉरंटाईन राहणे आवश्यक असतांना साहेबांनी आल्याआल्या उकनी, जुनाड व घोणसा खदानींचा दौरा केल्याचे समजते. नागपूर येथे १४७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून दिवसागणिक त्याठिकाणी रुग्ण आढळत असल्याने त्याठिकाणावरून आलेल्या व्यक्तीकडून धोका संभवू शकतो. शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने येथील नागरिक भीतीच्या सावटात वावरत असून प्रतिबंधित क्षेत्रातील काळजी वाहतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींबाबत प्रशासन कोणतीही जोखीम पत्कारू शकत नाही. परजिल्ह्यातून आलेल्या त्यातल्यात्यात हॉसस्पॉट झोन मधून आलेल्या व्यक्तींना कॉरंटाईनचा कालावधी पूर्ण न करता इतर व्यक्तींमध्ये वावरण्यास खुली सूट देणे नंतर प्रशासनाच्याच अंगलट येऊ शकते. याचा साक्षात्कार मुंबई कनेक्शनने घडवलाच आहे. मुंबई तेथून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना पसरल्याने शहरात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यातच बाहेरून आलेल्या या अधिकारी दर्जाच्या व्यक्तीने अशाप्रकारच्या लापर्वाहीने वागणे आता पचनी पडण्यासारखे नाही. नागपूर वरून आल्यानंतर याठिकाणचा कार्यभार स्वीकारून कर्तव्यातील अनेकांच्या संपर्कात येऊन मुक्त संचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोकळीक असणे म्हणजे ज्यांनी १४ दिवसांचा कॉरंटाईन पूर्ण केला त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे कोणत्याही दर्जाचा व्यक्ती परजिल्ह्यातून आल्यास त्याला इतरांप्रमाणेच १४ दिवसांच्या कॉरंटाईनमध्ये ठेवावे अशा प्रतिक्रिया खदानींमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या इतर कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.