कोरोना आटोक्यात आला आहे, ३२ नंतर ११ ही चाचणी अहवाल आले निगेटिव्ह
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर योग्य परिस्थिती हाताळल्याने कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासन यशस्वी ठरले असून २८ जून पासून एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने कोरोना आटोक्यात आल्याचे सध्यातरी जाणवत आहे. काल ३२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज ११ नमुन्यांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कोरोनाची साखळी तुटतांना दिसत आहे. आज आणखी १७ संशयितांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून दररोज २० नमुन्यांचे टार्गेट गृहीत धरण्यात आले आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात आहे. जे व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आले असतील किंवा ज्यांना कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे जाणवत असतील तसेच जे ६० वर्षे वयोगटातील असून ज्यांना आधीच विविध आजार जडले आहेत त्यांनी स्वतःहून समोर येऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे जे व्यक्ती नाव जाहीर होण्याच्या भीतीपोटी दडून असतील व ज्यांनी कॉरंटाईन होण्याच्या धास्तीने स्वतःबद्दल माहिती दडवून ठेवली असेल त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून निर्भीड होऊन समोर यावे व स्वतःच्या चाचण्या करून घ्याव्या. त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल व त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नसल्याचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी स्पष्ट केले आहे.
शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्या पासून येथील परिस्थितीवर विशेष लक्ष ठेऊन असलेल्या प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याने रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याबरोबरच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करून त्यांना विलीगीकरण कक्षात हलवून, लो रिस्क व हाय रिस्क असे दोन भाग पाडून हाय रिस्क व्यक्तींचे नमुने वेळीच तपासणीकरिता पाठविल्याने रुग्णांचे निदान लागत गेले.त्याचप्रमाणे रुग्ण आढळलेल्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करून संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपास मोहीम राबवून विशेष दक्षता घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात राहीली. आरोग्य विभाग व आशा सेविकांचे पथक प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घरी जाऊन त्यांच्या आरोग्या विषयी व त्यांच्या संपर्काविषयी माहिती जाणून घेत असून कंटेन झोन मधील प्रत्येकाचे स्कॅनिंग करण्यात येऊन त्या परिसराला वेळोवेळी सॅनिटायझर करण्यात आले. तेथील प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. संशयित आढळल्यास त्याचे स्वाब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले. लो रिस्क व्यक्तींना सात दिवस कॉरंटाईन तर हाय रिस्क व्यक्तींना चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही ७ दिवस आणखी कॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येत असल्याने त्यांच्यातील संक्रमणाच्या मर्यादा लक्षात येत असल्याचे सांगण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या अतिसंपर्कातील व्यक्तींच्या चाचणी अहवालावरून कोरोनाची संक्रमण क्षमता लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्याने कोरोना नियंत्रित ठेवण्यास प्रशासनाला यश आले. आशा सेविकांचे नऊ पथक कंटेन झोन मध्ये कार्यरत असून तिन्ही कंटेन झोन मधील १७६४ व्यक्तींची त्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. तसेच महावीर भवन, जगन्नाथबाबा परिसर व सेवानगर येथे मोबाईल फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांनी त्यातल्यात्यात मधुमेह व उच्चदाब अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी स्वतःहून तपासण्या करून घ्याव्यात. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्यास किंवा त्याविषयी माहिती द्यायची झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यांना कॉरंटाईन न करता फक्त त्यांचे नमुने घेतले जाईल. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्वतः विषयी किंवा आपल्यातील लक्षणा विषयी माहिती दडवून ठेवली असल्यास ती प्रशासनाला उघडपणे सांगावी. त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल. ग्रामीण रुग्णालयात सर्दी खोकल्याच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांचीही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांच्यातील गंभीरता ओळखून त्यांच्या नोंदी घेण्यात येत असल्याचेही उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या या लढाईत प्रशासन आपल्या सोबत असून कोरोनाला समूळ नष्ट करण्याकरिता नागरिकांनी स्वतःहून आपल्या तपासण्या करवून घ्याव्या व शहराला कोरोनमुक्त करण्यास सहकार्य करावे. असे आव्हानही एसडीओ शरद जावळे यांनी केले आहे.