झरीजामणी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा यवतमाळ येथे उपचारा दरम्यान मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी :-
झरीजामणी तालुक्यातील महादापूर येथे प्रसूती करिता माहेरी आलेल्या महिलेला प्रसूतीच्या कळा आल्यानंतर झरीजामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. कळा नॉर्मल असल्याने तिला पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे कोणतीही तपासणी न करता यवतमाळ शासकीय रुग्णालयात त्या महिलेला रेफर करण्यात आल्याने उपचारा दरम्यान पोटातच बाळ दगावले. दरम्यान तिला स्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने आयसोलेशन वॉर्डात हलवून तिची कोरोना तपासणी केली असता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून महिला दगावली आहे. तिच्या संपर्कातील व्यक्तींची शोधाशोध सुरु झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या झरी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने प्रशासनही चिंतेत आले असून आरोग्य विभागाची धावपळ सुरु झाली आहे.
मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या रूढा येथे वास्तव्यास असलेली २२ वर्षीय महिला प्रसूतीकरिता झरीजामणी तालुक्यातील महादापूर येथील आपल्या आई वडिलांकडे २२ मार्चला आली होती. तेंव्हा पासून ती माहेरीच असून तिला नववा महिना लागल्याने प्रसूतीच्या कळा जाणवू लागल्या असता २ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता झरी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. कळांची जेमतेम सुरुवात झाल्याने रात्री १० वाजेपर्यंत गंभीर स्वरूपाच्या कळा जाणवत नसल्याने त्या महिलेला पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्या महिलेला तेथे भर्ती करून न घेता सरळ यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर केल्याने उपचारा दरम्यान बाळ पोटातच दगावले. त्यातच महिलेला स्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने तिला आयसोलेशन वार्डात हलवून तिची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून त्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. उपचार दरम्यान महिला दगावली असून झरीजामणी तालुक्यातील ती कोरोनाचा पहिला बळी ठरली आहे. वणी नंतर झरीजामणीतही कोरोनाचा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासकीय यंत्रणा चिंतेत पडली असून महिला राहत असलेल्या परिसरा कडे धाव घेऊन संपर्कातील लोकांचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात आहे.