WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने झरी तालुक्यातील महादापूर हे छोटसं गाव हादरलं

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

झरीजामणी तालुक्यातील मांडवा गटग्रामपंचायते अंतर्गत येणाऱ्या महादापूर या छोट्याशा गावातील गर्भवती महिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात प्रसूती दरम्यान दगावली असून तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनातर्फे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आल्याने हे छोटेसे गाव भीतीच्या सावटात आले आहे. २२ मार्चला प्रसूती करिता माहेरी आलेल्या २० वर्षीय महिलेला नऊ महिने पूर्ण झाल्याने २ जुलैला झरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथील रुग्णालयात सायंकाळी ५.३० वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत भर्ती ठेवल्यानंतर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर किलनाके यांनी गर्भवती महिलेची तपासणी करून भर्ती न करता यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात त्या महिलेला रेफर केले. यवतमाळ शासकीय रुग्णालयात पोहचल्यानंतर पोटातच बाळ दगावल्याचे सांगण्यात येऊन प्रसूती करण्यात आली. यादरम्यान महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला आयसोलेशन वार्डात हलविण्यात आले. उपचारा दरम्यानच तिची प्राणज्योत मालवली. श्वसनास त्रास होत असल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आल्याने चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. महिलेच्या संपर्कातील १६ व्यक्तींना (हाय रिस्क) झरी नागरपंचायतेमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले असून १७ व्यक्तींना (लो रिस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. झरीचे उपविभागीय अधीकारी वैशाली विसपुते यांनी महादापूर गावाला भेट देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याबरोबरच गावाला प्रतिबंधितक्षेत्र घोषित करून गावाकडे जाणारे प्रत्येक रस्ते सील करण्यात आले.

झरीजामणी तालुक्यातील महादपूर, कोर्बाखेनी व मांडावा या तीन गावामिळून मांडावा गटग्रामपंचायत असून महादापूर तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकरिता माथार्जुन येथे जावे लागते. अंदाजे ३२५ लोकसंख्या असलेल्या या गावात ६० ते ७० घरे असून गावात एकच हातपंप असल्याने सर्व जण तेथूनच पाणी भरतात. खेडे गावात दाटिवाटीची वस्ती असल्याने सर्वांचाच एकमेकांशी संपर्क येत असतो. २२ मार्चपासून सदर महिला या गावात आपल्या आईवडिलांकडे प्रसूतीकरिता आली होती. २ जुलैला तिला नऊ महिने पूर्ण झाल्याने झरी ग्रामीण रुग्णालयात तपासणी करिता आणण्यात आले. सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत झरी ग्रामीण रुग्णालयात भरती ठेवण्यात आल्यानंतर त्या महिलेला पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात तिची तपासणी न करता तेथील डॉक्टरांनी सरळ यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर केले. यादरम्यान पोटातच बाळ दगावल्याने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती करण्यात अली. नंतर तिला श्वसनाला त्रास होत असल्याने आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. उपचार सुरु असतांनाच ती दगावली. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी तालुका व गावात पोहचली. गावात भीती बरोबरच हळहळ व्यक्त करण्यात आली. एकीकडे गाव दुःखात बुडाले तर दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीने जीव भांड्यात पडला. छोट्याशा या गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावकरीही संभ्रमात पडले. कधीकाळी कानावर पडणारं या गावाचं नाव कोरोनाने चर्चेत आलं. शहर प्रशासन, आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासनाचा भलामोठा ताफा गावामध्ये खबरदारीच्या उपाययोजनांकरिता दाखल झाला. गावकऱ्यांनी एवढेसारे अधिकारी एकत्रित पहिल्यांदाच गावात पहिले असावे. गाव सील झालं गावकरी हवालदिल झाले. त्या महिलेला कोरोना कसा काय झाला या विचारांनी त्यांच डोकं अगदी चक्रावत होत. भीती मुक्त असणारं गाव दहशतीत आलं. कधी कोरोनाच्या चर्चा ऐकणाऱ्या गावकऱ्यांना गावातच कोरोनाचा शिरकाव होईल याची कल्पनाही आली नसेल. पण या महाभयंकर आजाराची गावातील व्यक्तीला लागण झाल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share