शहरात आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली दहा !
प्रशांत चंदनखेडे वनी :-
शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वृद्धी होत असून आज आणखी एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख वाढत असून रुग्ण संख्या आता १० वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला साईनगरी परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरु असून परिसरात सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. पॉझीटीव्ह आढळलेल्या रुग्णाने स्वतःच नागपूर येथे कोरोना चाचणी केली असून आज त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला यवतमाळ येथे पुढील उपचार करिता हलविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज प्रतिबंधित क्षेत्र १,२ व ३ येथील संशयित व्यक्तींच्या पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २९ अहवाल प्रलंबित आहे.
शहरात २७ जून नंतर सहा दिवस कोणाचा रुग्ण न आढळून आल्याने कोरोना आटोक्यात आल्याचे वाटत असतांनाच ४ जूनला दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नव्याने कोरोनाची साखळी निर्माण झाली. त्यानंतर प्रशासनातर्फे त्या परिसरावर लक्ष केंद्रित करून तेथील संशयितांना शोधण्याचे कार्य सुरु असतांनाच आज आणखी एक रुग्ण कोरोना बाधित निघाल्याने प्रशासनाची डोके दुखी चांगलीच वाढली आहे. गजबजलेल्या वस्तीतील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाढत असून नागरिकांमध्येही धास्ती निर्माण होत आहे. कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता नागरिकांनी सावधानी बाळगणे अति गरजेचे झाले असून वर्दळीच्या ठिकाणी किंवा शहरात कोठेही भ्रमण करतांना तोंडाला मास्क लावण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनाची चांगलीच चिंता वाढली असून शहरातील विविध ठिकाणी उपाययोजनात्मक कार्य करतांना आरोग्यविभागाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. स्थिरावलेली रुग्णसंख्या अचानक वाढीस लागल्याने एकीकडे प्रशासन हादरले आहे तर दुसरीकडे शहरवासी कमालीचे धास्तावले आहेत.