शास्त्रीनगर परिसरातील जुगार अड्यावर पोलिसांची धाड, दहा आरोपी अटकेत
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील शास्त्रीनगर परिसरातील राहत्या घरी भरविण्यात येत असलेल्या जुगार अड्यावर मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून दहा आरोपींना अटक केली असून त्त्यांच्याजवळून एकूण ३ लाख ३१ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
शहरातील शास्त्री नगर येथे राहत्या घरी जुगार भरवण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना मिळताच त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून मध्यरात्री जुगार सुरु असलेल्या ठिकाणी सापळा रचून दहाही आरोपींना अटक केली. पोलिसांनी घर, गल्ली,मोहल्ला व व्यावसायिक ठिकाणांवर छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या जुगार अड्यांवर छापे मारल्याने जुगार खेळणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे. अगदी गोपनीय माहिती मिळवत शहरात सुरु असलेल्या जुगार अड्यांवर धाडी टाकत अट्टल जुगार खेळणाऱ्यांना जेरबंद केले आहे. शास्त्रीनगर येथील आरिफ रहेमान खलील रहेमान यांच्या राहत्या घरी मोठा जुगार भरविण्यात येत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार एसडीपीओ सुशील कुमार नायक यांनी आपल्या पोलीस पथकासह रात्री १२.३० ते १.३० वाजताच्या दरम्यान शास्त्री नगर येथील जुगार अड्यावर धाड टाकून दहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये आरिफ रहेमान खलील रहेमान (४२) रा. शास्त्रीनगर वणी, शरफोद्दीन शहा नन्ना शहा (५२) रा. रामपुरा वार्ड राजुरा, विनोद कवडूजी जिवतोडे (३७) रा. चिखलगाव वणी, गब्बार खाँ मोते खाँ पठाण (४०) रा. बालाजी सोसायटी यवतमाळ, नंदू रामराव खापणे (२७) रा. कोलगाव, अनिल ज्ञानदत्त मिश्रा (३२) रा. शास्त्रीनगर घुग्गुस, हिरासिंग दरबारसिंग अकाली (५२) रा. समुद्रपूर, जगदीश गुरुचरण पाटील (३७) रा. राजूर कॉलरी वणी, प्रशांत जोधराजजी कोठारी (४९) रा. सावरकर चौक वणी व जहीर रियाज शेख (३२) रा. घोन्सा यांचा समावेश असून त्यांच्या जवळून ३ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सादर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस दलाचे विजय वानखेडे, इकबाल शेख, आशिष टेकाडे, रवी इसनकर, अशोक दरेकर यांनी केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.