तालुक्यातील डोर्ली गावातील पुरात वाहून गेलेल्या आणखी दोन कास्तकारांचे मृतदेह आढळले
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शेतातील कामे आटपून परतेच्या वाटेवर असलेल्या कास्तकारांवर काळाने घाला घालून त्यांना मृत्यूची वाट दाखवल्याने डोर्ली गाव पूर्णतः हादरून गेले आहे. ९ जुलैला डोर्ली येथे पडलेल्या मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने तीनही बैलगाड्या बैलांसह पुरात वाहून गेल्याने तीन कास्तकारांना जलसमाधी मिळाली. काल ९ जुलैला एक महिला काही अंतरावर मृतावस्थेत मिळाली तर आज १० जुलैला २ व्यक्ती कुरई जवळील डोर्लीकर यांच्या शेताजवळ मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील डोर्ली गावातील कास्तकार वावरातील कामे आटपून गावाकडे परत येत असतांना मुसळधार पावसामुळे शेतशिवारातील पांदण रस्त्यावरील नाले पाण्याने भरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तीन बैलगाड्या नाल्यातून मार्गक्रमण करत असतांना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने तीनही बैलगाड्या नाल्यात उलटल्या व त्यामध्ये सवार असलेले शेतकरी पुरात वाहू लागले. पाच कास्तकारांपैकी मीना मारोती कुडमेथे (३५) हि महिला काही अंतरावर मुतावस्थेत आढळून आली तर मनीषा प्रशांत सिडाम व मीना मनोहर सिडाम या महिला थोड्या दूरवर सुखरूप आढळून आल्याने त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या पुरात वाहून गेलेल्या विनायक झोलबा उपरे (४७) व हरिदास रामा खाडे यांचे आज १० जुलैला कुरई येथील डोर्लीकर यांच्या शेताजवळ मृतदेह आढळून आल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. शेतात राबून झाल्यानंतर घराच्या ओढीने निघालेल्या शेतकऱ्यांवर नियतीने डाव साधत त्यांना मृत्यूच्या दाढेत लोटले. गाव जवळ करण्याच्या लगबगीत पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यूच्या गावी जाण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. तीन शेतकऱ्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.