WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

पांढरकवडा तालुक्यातील मूचीपोड, गवराई (मांगूरडा) या गावातील आदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर अट्रोसिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून कडक कार्यवाही करण्याची मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पांढरकवडा शाखेच्या वतीने यवतमाळ पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात मागासवर्गीय समाजातील महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढले असून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून या समाजातील लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट केल्या जात आहे. मागासवर्गीय समाजातील होतकरू तरुणांवर जीवघेणे हल्ले करण्यात येत असून महिलांवर बळजबरी करण्याचे प्रकार वाढले आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत मागासवर्गीय समुदायातील व्यक्तींवर अनन्वित अत्याचार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न काही सदन समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून करण्यात येत असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचे वचक निर्माण करण्याकरिता शासन प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पांढरकवडा तालुक्यातील दुर्गम भागातील एका कोलाम आदिवासी महिलेवरील अत्याचाराने मागासवर्गीय महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा येरणीवर आला आहे. ६ जुलैला मूची पोड येथील आदिवासी महिला आपल्या शेतात काम करत असतांना सुमित अजय दोडके याने शेत शिवारात जाऊन सदर महिलेचा विनयभंग करून धक्काबुक्की केली. सुमित दोडके हा सृजन संस्था चालक अजय दोडके यांचा मुलगा असून तो आपल्या वर्चस्वाच्या ताकतीचे प्रदर्शन करून आदिवासी महिला व तिच्या कुटुंबाला दहशतीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पोलीस प्रशासन आमचे काहीही करू शकत नाही असे वक्तव्यही सुमित दोडके याच्याकडून करण्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुमित दोडके याच्यावर अद्यापही गुन्हा नोंदविण्यात आला नसून आदिवासी महिला व तिचे कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये पायपीट करत आहे. ६ जुलैला सदर महिलेचा विनयभंगाचा प्रकार घडल्यानंतर अद्यापही एफआयआर नोंदवून न घेतल्याने याबाबत संशय व्यक्त केल्या जात आहे. तेंव्हा महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची योग्य तपासणी करून आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर अट्रोसिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या पांढरकवडा शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. प्रकरणाचा अतिशीघ्र तपास करून आरोपीला अटक न केल्यास आदिवासी संघटनांद्वारे आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहराज्यमंत्री अनिल देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार संदीप धुर्वे व पांढरकवडा ठाणेदारांना पाठविण्यात आल्या आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share