आदिवासी समाजातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करा, आमदार भीमराव केराम यांचे निर्देश
प्रशांत चंदनखेडे वणी :-
पांढरकवडा तालुक्यातील गवराई (पोड) या गावातील अनुसूचित जमातीच्या महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाची शीघ्र चौकशी करून आरोपीला तत्काळ अटक करावी तसेच त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश किनवट माहूर विधानसभा क्षेत्राचे आमदार भीमराव केराम यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना ऑनलाईन पाठवलेल्या पत्रातून दिले आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु असून या काळात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिला पुरुषांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही सदन समाजातील गुंड प्रवृत्तीचे लोक जातीयवादी मानसिकतेतून या प्रवर्गातील व्यक्तींवर अमानुष अत्याचार करीत आहे. कधी राजकीय वर्चस्वाचा आधार घेत तर कधी प्रतिष्ठेच्या गर्वात आंधळे होऊन हे असामाजिक प्रवृत्तीचे लोक दुबळ्या लोकांवर अत्याचार करीत असल्याने समाजात दुही निर्माण होत आहे. आदिवासी समाजातील महिला पुरुषांवर अत्याचार करून ते आपली सामाजिक प्रतिष्ठा गाजवतांना दिसत आहे. स्वतःच्या शेतशिवारात काम करणाऱ्या गवराई (पोड) येथील महिलेला तिच्याच शिवारात जाऊन तिचा विनयभंग करीत तिला ओढाताण करून अमानुष अत्याचार करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या सुमित अजय दोडके नामक व्यक्तीला तत्काळ अटक करण्यासंदर्भातील निर्देश आमदार भीमराव केराम यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना ऑनलाईन पाठवलेल्या पत्रातून दिले आहेत. या संदर्भात काही आदिवासी संघटनांनी आमदार केराम यांना निवेदने देऊन या प्रकरणातील आरोपीला अटक करून अट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली होती. पांढरकवडा तालुक्यातील गवराई (पोड) या अतिदुर्गम भागातील कोलाम आदिवासी समाजातील ही महिला शेतात काम करीत असतांना पांढरकवडा येथील सृजन संस्थाचालकाचा मुलगा सुमित अजय दोडके याने तिच्या शेतात जाऊन तिचा विनयभंग करीत तिला मारहाण केली. तसेच स्वतःच्या ताक्तीचे प्रदर्शन करीत आदिवासी समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करून स्वतः विरोधात तक्रार करण्याचे खुले आव्हान दिले. नेमकी हीच परिस्थिती त्या महिलेवर ओढवली आहे. तिची कैफियत कुणीही ऐकायला तयार नसून तिची साधी तक्रारही नोंदविल्या गेली नाही. महिलेची सारखी पोलीस स्टेशन मध्ये पायपीट सुरु असून तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्याकरिता या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून प्रकरणाची शीघ्र चौकशी करून आरोपीला तत्काळ अटक करावी तसेच त्याच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार भीमराव केराम यांनी पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रातून दिले आहे.