शहरातील बाजारपेठे करिता सुधारित वेळापत्रक जाहीर, १० ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील दुकाने !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोना संक्रमणाची गती तीव्र झाल्याने दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण आढळत असून बाधितांची संख्या उचांक गाठु लागली आहे. या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरात घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी दालनात सर्व पक्षीय आमदारांची कोरोना नियोजना संदर्भात आढावा बैठक बोलावून सर्वच विधानसभा क्षेत्रातील कोरोना विषयक परिस्थिती जाणून घेतांना झालेल्या चर्चेतून शहरातील बाजारपेठेचा वेळ कमी करून सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यावर शिक्का मोहर्तब झाल्याने आज तशा सूचना प्रशासना तर्फे व्यासायिकांना देण्यात आल्या आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्र्यांनी १३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पक्षीय आमदारांची आढावा बैठक बोलावून प्रत्येक तालुक्यातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वांनी आपापल्या सूचना मांडल्यानंतर शहरातील वर्दळीवर अंकुश लावण्याकरिता बाजारपेठेचा निर्धारित वेळ कमी करून १० ते २ हे सुधारित वेळापत्रक शहराकरिता जाहीर करण्यात आले आहे. मेडिकल व दवाखाने नियमित वेळेनुसार सुरु राहील तसेच कृषी केंद्रांना सकाळी १० ते साय. ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. बँकेचे व्यवहारही १० ते २ या वेळातच सुरु राहतील. फिरत्या दूध विक्रेत्यांना सकाळी ७ ते दुपारी २ व साय. ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूध वाटप करता येईल. पेट्रोलपंपही सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार असून अत्यावश्यक सेवेतील वाहनांकरिता २४ तास सेवा देता येईल. मॉर्निंगवॉक, व्यायाम व सायकलिंग करीता सकाळी ६ ते ८ हि वेळ देण्यात आली आहे. गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉय व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी केंव्हाही जाण्यास मुभा देण्यात आली असून त्यांच्या जवळ संबंधित कार्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. या अस्थापनांव्यतेरिक्त सम्पुर्ण बाजारपेठ ही १० ते २ या सुधारित वेळे नुसार सुरु राहील. ठरवून दिलेल्या वेळेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे.