शहरातील सर्व १९ नमुन्यांचे अहवाल आले निगेटिव्ह, शहरविसीयांना मिळाला दिलासा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचा विळखा वाढत असतांनाच आज सहाव्या साखळीतील १९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या सर्वच नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे शोधकार्य सुरु असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अठरा असून त्यापैकी ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत शहरातील ११ कोरोना बाधित रुग्णांवर यवतमाळ, नागपूर व सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागावी म्हणून आज १५ जुलै पासून बाजारपेठेच्या वेळात बदल करण्यात येऊन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यासंदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. शहरातील वर्दळीवर नियंत्रण मिळविण्याकरिता बाजारपेठेची वेळ कमी करण्यात आली असली तरी १० ते २ या वेळात बाजारपेठेत चांगलीच वर्दळ दिसून आली. दोन वाजेपर्यंतची वेळ निर्धारित करण्यात आल्याने नागरिकांची खरेदीकरिता आणखीनच गर्दी दिसत होती. दुकाने बंद होण्याच्या काळजीने खरेदीकरिता त्यांची चांगलीच लगबग पाहायला मिळत होत. दुकाने बंद झाल्यानंतरही नागरिकांची रस्त्यांवर रेलचेल दिसून येत होती. शासनाने ७ वाजेपर्यंत वाढवलेली दुकानांची वेळ प्रशासनाने कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता पाच तासांनी कमी करून दुपारी २ वाजेपर्यंत निर्धारित केली आहे. तेच शहर, तीच बाजारपेठ व हीच जनता चार तास एकत्र वावरत असतांना ५ तास कमी केल्याने कोरोना कितपत नियंत्रणात राहील याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. कोरोनाचे सतत रुग्ण आढळत असल्याने शहरवासियांमध्ये भीती निर्माण झाली असतांनाच प्रशासनही चिंतेत आले आहे. अशातच कोरोनाची रोखथाम करण्याकरिता कणखर नियोजनाची मागणी शहरातून होऊ लागली. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता कडक निर्बंध लावण्याच्या जनतेच्या मागण्यांची दखल घेत पालकमंत्र्यांनी जील्हाधिकारी दालनात सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावून प्रत्येक तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्या करीता कोणते नियोजन करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. काही तालुक्यात तर जनता कर्फ्यू सुरु आहे. मग उरलेल्या तालुक्यांमध्ये बाजारपेठांच्या वेळांचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उर्वरित तालुक्यांमध्ये १० ते २ पर्यंत बाजारपेठेची वेळ निर्धारित करण्यात आली. त्यामुळे शहरातील वर्दळ कमी होऊन लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी होईल ही या निर्णयामागची अपेक्षा आहे. त्यानंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कोणत्या प्रकारचे निर्बंध लावता येतील याकडेही लक्ष देणे गरजेचे राहणार असून मौज मजेकरिता बाजारात फ़िरणाऱ्यांमुळे अनावश्यक गर्दी निर्माण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. शेवटी शहरातुन कोरोनाला हद्दपार करण्याकरिता सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता असून हे एक टीमवर्क असल्याने सर्वांनीच आपापली जबाबदारी पार पडण्याची आवश्यकता आहे.