आता कुणाकडे घालावे साकडे, वाढतच आहेत कोरोना बाधितांचे आकडे !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या साखळ्या तुटण्याऐवजी नवीन साखळ्या त्यात जुळतांना दिसत आहे. कोरोना बाधितांचा आकडा फुगत चालला असून शहरात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे. एकीकडे शीवायला गेलं की दुसरीकडे उसवत असल्याने प्रशासनही चिंतेत पडलं आहे. आरोग्य विभागांतर्गत आशासेविकांची पथके सकाळ सायंकाळ प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या देखभालीत जुटली आहेत. नागरपालिकेतर्फे नियमित फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. १५ जुलैपासून बाजारपेठेच्या वेळापत्रकांतही बदल करण्यात आला आहे. प्रशासन कोरोनाची रोखथाम करण्याकरिता हरसंभव प्रयत्न करीत असून कंटेनमेंट झोन मधील नागरिकांची विशेष दक्षता घेतल्या जात आहे. असे असतांनाही कोरोना बाधितांचा आलेख वाढतच चालला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे. सात रुग्ण कोरोना मुक्त झाले असून १२ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज १६ जुलैला तेली फैल परिसरातील कंटेनमेंट झोन व बफर झोन मधील एका वयोवृद्ध व्यक्तीसह तेवीस लोकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणी मध्ये २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर बफर झोन मधील वयोवृद्ध व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ निर्माण झाली. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जवळून संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींना (हाय रिस्क) कोविड केयर सेंटरमध्ये हलविण्यात आले तर २७ व्यक्तींना (लो रिस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच तेलीफैल परिसरातील प्रतिबंधित क्षेत्र वाढविण्यात आले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. त्याच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेणे सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
शहरातील कोरोना संक्रमणाच्या गतीत वाढ झाली असून एकामागून एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असून शहरातील वर्दळ नियंत्रित राहावी याकरिता बाजारपेठेची वेळही कमी करण्यात आली आहे. तरीही कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला असून नियोजन दुबळं पडत असल्याचे दिसून येत आहे. १३ जुलैला याच परिसरातील ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना संसर्गाची प्रसारण क्षमता वाढली असल्याचे दिसून येत आहे. एका पासून दुसऱ्याला अल्पावधीतच लागण होत असल्याचे आढळून येत आहे. २० जून ते २७ जून पर्यंत ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यामध्ये वणी वरोरा रोडवरील महावीर भवन समोरील एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती, जगन्नाथबाबा मंदिरामागील एक व्यक्ती, सेवानगर येथील एक महिला यांचा समावेश होता. त्यानंतर २८ जून ते ३ जुलै या कालावधीत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटली असल्याचे सर्वांनाच वाटू लागले. परंतु ४ जुलै ते १६ जुलै दरम्यान १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली. ४ जुलैला पेट्रोल पंप व्यावसायिक व त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कोरोना शहरात परत एकदा सक्रिय झाला. त्यानंतर ८ जुलैला साईनगरी येथील एका व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. लगेचच ९ जुलैला पेट्रोपम्प व्यावसायिकांच्या नात्यातील चिखलगाव रोडवरील द्वारकानगरी अपार्टमेंट मधील दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर १० जुलैला तेलीफैल येथील एका महिलेचा सेवाग्राम येथे तर आनंदनगर येथील एका डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा यवतमाळ येथे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. १२ जुलैला साईनगरी परिसरातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर १३ जुलैला तेलीफैलातील २ पुरुष व एक महिला कोरोना बाधित निघाली. त्याचबरोबर आज १६ जुलैला तेलीफैलातील बफर झोन मधील एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या १९ झाली आहे. शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत दिसेंदिवस वाढ होत असून एकमेकांच्या संपर्कातून एकमेकांना लागण होत आहे. शहरातील वर्दळीवर खऱ्या अर्थाने नियंत्रण मिळविणे आवश्यक असून मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी करण्याची आज खऱ्या अर्थाने वेळ आली आहे. बाजारपेठेची वेळ कमी केल्याने गर्दी कमी होईल ही संकल्पना मांडण्यात आली परंतु वेळ कमी झाल्याने उलट जास्त गर्दी वाढल्याचे आढळून आले. बाजार बंद झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांवरून नागरिकांची रेलचेल सुरूच असते. त्यामुळे काही काळासाठी एक तर संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवावी लागेल नाहीतर वेळेचे बंधन ठेवल्याने वर्दळीवर फारसा काही फरक पडेल याची शक्यता फारच कमी दिसत आहे.बाजार सुरु असल्याने प्रत्येक व्यक्ती गर्दीचा हिस्सा बनत असल्याने कोन कोणाच्या संपर्कातील आहे याचीही ओळख नसते. तेंव्हा आता कठोर उपाययोजनांची गरज असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.