शहरातील कोल ट्रान्सपोर्टींग कंपन्यांमध्ये बाहेरून येणाऱ्या कामगारांची ना तपासणी, ना क्वारंटाईन !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचा उद्रेक होत असतांना शहर व तालुक्यात पर ठिकाणांवरून छुप्या मार्गाने येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा आणखीनच धोका निर्माण झाला आहे. तालुक्यात कोळसा खदानी मोठ्या प्रमाणात असल्याने याठिकाणी कोल ट्रान्स्पोर्टींग व्यवसाय बहरला असून ट्रांसपोर्टींग कंपन्यांचं जाळं निर्माण झालं आहे. शहरातील बहुतांश ट्रांसपोर्ट कंपन्या परप्रांतातील असल्याने या कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगारांची छुप्या पद्धतीने ने आण सुरु असते. या ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये परठिकाणावरून येणाऱ्या कामगारांची कोणतीही खबरदारी घेतल्या जात नसून येताच क्षणी इतर कामगारांबरोबर त्याला कामावर लावण्यात येते. त्यामुळे तेथील इतर कामगारांमध्ये भीती निर्माण होत आहे. परठिकाणांवरून कोणतीही व्यक्ती शहरात आल्यानंतर आधी त्या व्यक्तीची कोविड केंद्रामध्ये तपासणी करून त्याला १४ दिवस अलगीकरणात ठेवणे बंधन कारक असतांना ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक प्रशासनाने सुचविलेले सर्व नियम धाब्यावर ठेऊन परठिकाणावरून आलेल्या त्या व्यक्तीला त्वरित कामाला लावून इतर कामगारांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. कोलार येथील वेकोलीशी निगडित असलेल्या खेतान प्रा.ली. या कंपनीमध्ये तीन दिवसांआधी या कंपनीच्या मेंन इन्चार्जसह चार कर्मचारी राजस्थान येथून आले आहेत तर वणी घुगुस रोडवरील नामांकित कोल ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये काल एक कामगार व्यक्ती परठिकाणावरून आला आहे. ट्रान्सपोर्ट कंपनी मालकांनी हे कामगार शहरात दाखल झाल्यानंतर त्यांची तपासणी करून १४ दिवस होम क्वारंटाईन न करता येताच क्षणी सरळ कामाला जुंपल्याने तेथील इतर कामगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
कोरोनमुक्त असणाऱ्या वणी शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळेच कोरोना दाखल झाला व नंतर बाहेरून आलेल्यांमुळेच प्रसारही वाढला. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तीला सरळ आत प्रवेश मिळू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या. तसेच परठिकाणांवरून येणाऱ्या व्यक्तींना आधी कोविड केयर सेंटर मध्ये तपासणी करून नंतर १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. तरीही काही कंपन्यांमध्ये कामगारांना छुप्या पद्धतीने प्रवेश देण्यात येत असून खबरदारीच्या नियमांचे पालन न करता सरळ त्यांच्याकडून कामे करून घेतली जात आहे. या ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये जवळच्या जिल्ह्यातून कामगारांची डेली उपडाऊन तर सुरूच असते त्यातल्यात्यात आता परप्रांतीय कामगारांचेही आगमन होत असल्याने आधीच जीव मुठीत घेऊन त्याठिकाणी कामावर जाणारे शहरातील कामगार यामुळे चांगलेच धास्तावले आहेत. खेतान प्रा.ली. ही व्हाल्वो कंपनी कोलार येथील कोळसा खदानीचे विस्तारीकरण व खदानींमधून कोळसा काढून देण्याकरिता मागील दोन वर्षांपासून याठिकाणी कार्यरत आहे. या कंपनीत २०० ते ३०० वर्कर काम करतात. बहुतांश वर्कर हे वणी तालुक्यातील आहे. परराज्यातील कामगार कोरोनाच्या धास्तीने आपापल्या राज्यात निघून गेले होते. परंत्तू कंपनी आता त्यांना छुप्या मार्गाने आणत असून कोणतीही तपासणी न करता त्यांना कामावर ठेऊन इतर कामगारांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. वणी घुगुस मार्गावरील या नामांकित कोल ट्रान्सपोर्ट कंपनी मध्येही दोनशेच्या आसपास कामगार काम करत असून त्याठिकाणीही पर राज्यात परतलेल्या कामगारांना छुप्या पद्धतीने बोलावून तपासणी न करता इतरांसोबत कामाला लावले जात आहे. तेंव्हा प्रशासनाने ट्रांस्पोर्टींग कंपन्यांनी चालविलेल्या या गंभीर प्रकारची दखल घेऊन इतरांच्या आरोग्यास हानी होणार नाही याकरिता परठिकाणावरून कंपन्यांमध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना १४ दिवस अलगीकरणात ठेवण्याची मागणी याठिकाणी काम करणाऱ्या इतर कामगारांकडून होत आहे.