श्रावण मासी हर्ष मानसी शहरी वर्दळ वाटे चोहीकडे, कोरोनाची भीती कुना चिकन घेऊ द्याना आम्हा गडे !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
श्रावण मास म्हटलं की ऊन सावल्यांचा खेळ, झाडे वेलींना नवीन पालवी फुटून सृष्टी अगदी हिरव्याकंच शालूत नटलेली दिसते. पावसाचीची रिमझिम सुरु असते. वातावरणात गारवा निर्माण झालेला असतो. खुल्या जागेत निसर्गनिर्मित झाडे डुलत असतात. गावखेड्यातही हिरवळ निर्माण होऊन शेत शिवरं हिरव्या नवलाईत स्वतःला न्याहाळतांना दिसतात. धरणीचं हिरवं रूप प्रत्येकालाच खुणावत असतं. जंगल घाटीत हिरवं आच्छादन पसरलेलं दिसतं. नदी नाले तुटुम्ब भरून वाहत असतात. झरण्याचं पडणारं पाणी मनाला मोहून टाकतं. अशा या आल्हादायक वातावरणात मन अगदी प्रसन्न होऊन निसर्गाशी एकरूप होतांनाच निसर्गाच्या सानिध्यात रमतांना दिसतं. तेंव्हा निसर्गाची सुंदरता वर्णन करणाऱ्या कवितांची अलगत आठवण मनाला शिवून जाते आणि काही स्मरणातील कवितांच्या ओळी डोळ्यासमोर तरंगू लागतात.धूसर झालेल्या शब्द कोशातील विरळ झालेल्या काही ओळी हळूच स्मरणात येतात. आणी अंतर्मनातून साजेशे बोल ऐकू ऐकू येतात " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे " अशा या श्रावण मासाची गोडवी गाणाऱ्या कविता कुठे व दशकानुदशके समाजाला चिकटलेल्या परंपरा कुठे. श्रावण मासाला परंपरेची नाळ जुडली असल्याने कोरोनाच्या संकटातही रविवारचा बाजार मांस मटणाच्या खरेदीने गजबजून उठला होता. श्रावण महिन्यात मांस मटनाला शिवताही येत नसल्याने श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवसा आधीच कुटुंबाला मनसोक्त मांस मटण खाऊ घालण्याकरिता चिकन मटणांच्या दुकानांवर नागरिकांनी चांगलाच विळखा घातला होता. श्रावण महिना लागण्या आधीचा शेवटचा दिवस चिकन मटणाच्या मेजवानीचे साजरा व्हावा म्हणून चिकन मटण शॉपवर अक्षरशः रीघ लागली हिती. प्रत्येक जीव चिकन मिळविण्यासाठी धडपडत होता. सव्वा महिना चिकन तोंडी लागणार नाही याची धक पकडून चिकन मटण शॉपवर नागरिकांनी आपला मोर्चा वळवला होता. गल्लीबोळातील प्रत्येक चिकन शॉपवर गर्दी ओसंडून वाहत होती. ग्राहकांची प्रतीक्षा करणाऱ्या दुकानदारांना आज ग्राहकांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते. आज चिकन मटणांच्या दुकानांतील गर्दी पाहून सोशल डिस्टंसिंगची व्याख्या कशी मांडावी हेच कळत नव्हते. विनामास्क एकमेकांशी संवाद साधत काही लोक कोरोनालाच आव्हान देत होते. एरव्ही परिचयाच्या व्यक्तीशी बोलतांना नाकावरील रुमाल तोंडावर आल्यास धाक दपट करणारी यंत्रणा आज कुठेच आढळून आली नाही. शहरातील प्रत्येक चौकात जॅम लागत होते. लॉकडाऊनच्या काळात शहरातील वर्दळीचे उग्र रूप आज पाहायला मिळाले. बहुतांश शहर बांधव, दुकानदार व दुकानांतील कामगारवर्ग मास्कचा वापर न करता ऑन्ली टॉक करतांना दिसत होता. त्यांना टोकणारा व नियमांचे पाठ गिरवणारा यंत्रणेतील कोणताच शिपाई त्याठिकाणी आढळून येत नव्हता. कोरोनाच्या भीतीचा लवलेशही आज शहरात जाणवत नव्हता. पशु पक्षांवर कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या अफवेने घाबराहट निर्माण होऊन चिकन दुकानांकडे पाठ फिरविणाऱ्या जनतेचे समाधान होताच त्यांनी चिकन दुकानांवर अक्षरशः धाबा बोलला. आज चिकन दुकानांवर उसळलेल्या गर्दीने दारू दुकानांवरील गार्दीचेही रेकार्ड तोडले. "प्रत्येकाचा एक दिवस येतो" ही म्हण अशीच प्रचलित झाली नाही. आजचा दिवस चिकन विक्रेत्यांना समर्पित राहिला. नागरिकांची आजची गर्दी पाहून कोंबड्याही चांगल्याच धास्तावल्या असेल. त्यांनाही कळून चुकले असेल की आज आपली काही खैर नाही. सोमवार पासून चिकन मटणाचे नावही तोंडावर येऊ न देणाऱ्या नागरिकांना दातात मांसाचा कणही अडकून राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. श्रावण महिन्यात सृष्टीला साज चढतो तसाच बाजाराचा आभास होत होता. धरणी जशी हिरव्या सौंदरियात न्हाऊन निघते तसच चिकन दुकानाचं सौंदर्य नागरिकांनी खुलवलं होतं. कोरोनावर मात करण्याकरिता इम्युनिटी पॉवर वाढवण्याचे आव्हान होत असतांना आज इम्युनिटी पॉवर वाढवण्याकरिता चिकन मटण खरेदी करणाऱ्यांचा कम्युनिटी पॉवर पाहायला मिळाला.