कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने तेलीफैल परिसर हादरला !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोना या साथीच्या रोगाने उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली असून शरवासियांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी तेलीफैलातील दोन अल्पवयीन मुला मुलीला कोरोनाची लागण झाल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढून २२ झाली आहे. ११ रुग्ण कोरोनातुन पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे शहरात आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ झाली आहे. सोमवाराला २९ पैकी २४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २२ निगटीव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून ५ अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही १३ व १० वर्षे वयोगटातील मुला मुलीला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या २३ व्यक्तींना (हाय रिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे तर २८ व्यक्तींना (लोरीस्क ) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तेलीफैल परिसरात आता पर्यंत ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर कोरोना संक्रमणाचे केंद्रबिंदू बनत असल्याचे सध्या तरी जाणवत आहे.तेलीफैलात तयार झालेल्या कोरोनाच्या दोन्ही साखळ्या तोडण्याकरिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता नगर परिषद व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक परिसरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरने तपासणी करण्यात येत आहे. सर्वेक्षणाकरिता ५२ पथके तयार करण्यात आली आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही योग्य सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन विविध उपाययोजनांचे प्रयोग करीत असून बाजारपेठेच्या वेळांत बदल करण्याबरोबरच घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह निघालेल्या तेलीफैल परिसरातील महिले पासून याठिकाणी कोरोनाची साखळी तयार झाली. १० जूलैला सेवाग्राम येथे ६५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर १३ जुलैला पॉझिटिव्ह महिलेच्या कुटुंबातील दोन पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १६ जुलैला त्याच परिसरातील एक ७० वर्षीय वृद्ध पॉझिटिव्ह निघाला. लगेचच १७ जुलैला वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि काल २० जुलैला १३ वर्षीय मुलगा व १० वर्षीय बालिका कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तेलीफैल परिसरात एकूण ८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा व एकमेकांशी आपुलकीची नाळ जुडून असणारा तेलीफैल चांगलाच हादरून गेला असून हसत्या खेळत्या परिसराचं आता उदासवाणं रूप पाहायला मिळत आहे. उद्या कोण पॉझिटिव्ह निघेल या विचाराने त्यांच्या मनात धडकी भरतांना दिसून येत आहे. परिसरातील प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या दहशतीत वावरतांना दिसत आहे. आता केंव्हा या साखळ्या तुटेल या चिंतेत ते दिवस कंठत आहेत.