तालुक्यातील राजूर ( कॉलरी) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला
प्रशांत चंदनखेडे वणी :-
कोरोनाने ग्रामीण भागातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून वणी पासून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉलरी ) गावात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेली महिला आधीच आजारग्रस्त असून तिचे हार्टचे ऑपरेशन करण्यापूर्वी तिची नागपूर येथे कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ती पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे वणी तालुक्याची रुग्ण संख्या आता २३ झाली आहे.
राजूर ( इजारा) येथील श्रीराम नगर येथे वास्तव्यास असलेली महिला राजूर (कॉलरी) येथील आपल्या कुटुंबाकडे १० दिवसांआधी राहायला आली होती. माहेरी आलेल्या या महिलेला हार्टची बिमारी असून त्यावर उपचार करण्याकरिता ती नागपूर येथील खाजगी दवाखान्यात १९ जुलैला भरती झाली. हार्टची शस्त्रक्रिया करावी लागत असल्याने आधी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ती कोरोना बाधित आढळून आली. त्यामुळे ती दहा दिवसांपासून राहत असलेला राजूर (कॉलरी) परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला असून परिसराला सील करण्यात आले आहे. तसेच श्रीराम नगर मधील ती राहत असलेले घरही सील करण्यात आले आहे. तिच्या कुटुंबातील व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करण्यात येत आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून ग्रामीण भागातही कोरोना दाखल होतांना दिसत आहे. राजूर (कॉलरी) येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राजूर बरोबरच आसपासच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २३ झाली आहे. त्यामुळे प्रशासनावरील तान चांगलाच वाढला आहे.