WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सेतू केंद्रामध्ये वीज नसली की कामकाज बंद, दररोज वेळे आधीच केले जाते कामकाज बंद !

ImageImageImageImageImage

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील तहसील कार्यालयाशी निगडित असलेल्या सेतू केंद्रावर महत्वपूर्ण दाखले काढण्याकरिता आवेदनपत्र सादर करून अपेडेव्हिट करतांना नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळातही कपात करण्यात आल्याने कमी वेळात दाखले काढतांना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. दोन वाजेपर्यंतचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. त्यातही सेतू केंद्रातील स्टाफ अर्धा तास आधीच कामकाज बंद करून नागरिकांशी हुज्जत घालून अरेरावीची भाषा करत वाद घालतांना दिसतात. मंगळवारला तर वीज पुरवठा खंडित झाल्याने दोन वाजेपर्यंत नागरिक तात्काडत बसले होते. शेवटी वीज न आल्याने त्यांना प्रतिज्ञापत्र परत करून दुसऱ्या दिवशी यायला सांगण्यात आले. सेतू केंद्रामध्ये साधे इन्व्हर्टरही नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत तेथील स्टाफला विचारले असता इन्व्हर्टर दुरुस्तीकरिता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंव्हा दिले याचे काहीही उत्तर त्यांच्या कडून मिळाले नाही.

याठिकाणी कायर येथील बराच शेतकरीवर्ग शेतीविषयक कर्जासंबंधीचे दाखले काढण्याकरिता आला होता. शेतीच्या कामाचा हंगाम सुरु असून हातची कामे सोडून शेतकरी दाखले काढण्यासाठी खेड्यापाड्यातून तहसील कार्यालयामध्ये येतात. परंतु त्यांना सेतू केंद्रामधील असुविधांचा सामना करावा लागत आहे. कंप्युटर ऑपरेटर स्टाफ थोड्या थोड्या गोष्टींकरिता कुणाशीही हुज्जत घालतांना दिसतो. आधीच चार तासांचा वेळ त्यातही अर्धातास आधीच कामकाज बंद करण्यात येत असल्याने त्याठिकाणी दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. बसचे टाईमिंग नाहीत, ऑटो वेळेवर मिळत नाही अशा परिस्थितीतही दाखले काढण्याकरिता खेड्यापाड्यातून लोकं येतात. पण त्यांना मिळतात फक्त समोरच्या तारखा. शैक्षणिक, शेतीविषयक व अन्य महत्वपूर्ण दाखले काढण्याकरिता आधी सेतू केंद्रात आवेदनपत्र सादर करावे करावे लागते. सेतू केंद्रात रोजंदारी स्टाफ असून त्यांची बोलण्याची भाषाही अगदीच उद्धट आहे. सर्व कामे बाजूला सारून दाखले काढण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना कधी वीज नसल्याने तर कधी वेळे आधीच कामकाज बंद होत असल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share