शहरातील तेलीफैल परिसरातील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू , सेवाग्राम येथे सुरु होता उपचार !
प्रशांत चंदनखेडे वणी:-
शहरातील तेलीफैल परिसरातील ६५ वर्षीय महिला सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तेलीफैलात कोरोना बाधित रुग्णांची मालिकाच सुरु झाली. १० जुलैला सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर १३ जुलै पासून तिची प्रकृती चांगलीच गंभीर झाली. आयसोलेशन विभागात व्हेंटिलेटरवर असतांनाच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. त्यामुळे वनी तालुक्यात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान काल राजूर येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात २३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे. काल २१ जुलैला राजूर येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील २६ व्यक्तींना (हायरिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले तर ९ व्यक्तींना (लोरीस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील जवळपास ८० व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
शहरातील तेलीफैल परिसरातील ६५ वर्षीय महिला मागील काही दिवसांपासून शारीरिक व्याधींनी ग्रस्त होती. तिने काही दिवस शहरातील खाजगी दवाखान्यातही उपचार घेतले. परंतु तिला आराम होत नसल्याने येथील डॉक्टरांनी तिला चंद्रपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रेफर होण्याचा सल्ला दिला. पैशाचे नियोजन नसल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. त्याठिकाणी प्रथम त्या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. १० जुलैला चाचणी अहवाल प्राप्त होऊन ती त्यात पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर १३ जुलैपासून तिची प्रकृती चांगलीच खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने मृत्युमुखी पडलेली ती तालुक्यातील पहिला रुग्ण ठरली आहे. त्या पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूने तेलीफैल परिसर चांगलाच हादरला असून तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे.