बुधवारी दमदार बरसलेल्या पावसाच्या ओढ्याने बोरगावातील वृद्ध वाहून गेला !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
पावसाळा सुरु झाल्यापासून बुधवारी २२ जुलैला शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. कधी आळत पाळत हलक्या सरी यायच्या व क्षणार्धातच लुप्त व्हायच्या. त्यामुळे वातावरणातील उकिरडाही कमी व्हायचे नाव घेत नव्हता. काल पावसाचे उग्ररूप पाहायला मिळाले. विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसला. बुधवारी दोन वाजता अचानक नभात ढग दाटून आले. व क्षणार्धात टपूऱ्या थेंबांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. उकिरड्याने चिडाऊ लागलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाळ्याची ही शहरातील पहिलीच दमदार एन्ट्री होती. पहिल्यांदाच रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहतांना दिसत होते तर खाच खळगेही काही प्रमाणात भरले असल्याचे पाहायला मिळत होते. परंतु याच अतितीव्र स्वरूपाच्या पडलेल्या पावसाने डोंगरी भागातील पाय वाटांवर पाण्याचा ओघ वाढल्याने वाट काढतांना अंदाज चुकलेल्या एका वृद्धाचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना वणी कोरपना मार्गावरील बोरगाव येथे उघडकीस आली असून काल सायंकाळी हा वृद्ध उंचावरून वाहत येत झाडाझुडपांमध्ये मृत अवस्थेत आढळून आला.
बोरगाव येथील नारायण सीताराम काळे (७०) हा गुरे ढोरे चारण्याकरिता जंगलभागात गेला असता दुपारी अचानक जोरदार सुरु झाल्याने तो घराच्या वाटेने जनावरे घेऊन निघाला. पावसाने पायवाटाही जलमय झाल्या असल्याने रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने सदर वृद्ध पाण्याच्या तीव्र ओघाने वाहून गेला व नंतर त्याचा सायंकाळी झाडाझुडपात मृतदेह आढळून आला. गुरेढोरे चारण्याकरिता गेलेल्या वृद्धाचा पावसाच्या ओघात अनाहक बळी गेल्याने बोरगावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.