शहरातील सतरा रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे, तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली सहा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाने कहर केला असून सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने शहरवासीयांबरोबरच प्रशासनही चिंतेत आले आहे. तेलीफैल परिसरातील आणखी एक युवक पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढून २४ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून १७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे झाले आहेत. एका कोरोना बाधित महिलेच्या मृत्यूची नोंद झाली असून तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण सध्या सहा आहेत.
वणी तालुक्याची लोकसंख्या २ लाख १ हजार ४८७ एवढी असून १० वर्षाखालील मुले १५२४० आहेत तर ६० वर्षावरील व्यक्तींची संख्या १९६१२ एवढी आहे. तालुक्यात आजपावेतो २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. १७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तालुक्यात सात प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले होते. सुरुवातीचे दोन प्रतिबंधित क्षेत्र मोकळे करण्यात आले असून पाच प्रतिबंधित क्षेत्र अद्यापही ऍक्टिव्ह आहेत. आता पर्यंत २६० व्यक्तींना (हायरिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात येऊन ४५८ व्यक्तींना (लोरीस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले. एकूण ४२९ व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले तर ९७ व्यक्तींची रॅपिड टेस्ट काण्यात आली. सातही प्रतिबंधित क्षेत्रातील ५ हजार ४१७ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील ६९८ गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यात आली. शहर व तालुक्यातील प्रत्येक कंटेन्टमेंट झोन मधील नागरिकांच्या हालचालींवर प्रशासनाने अगदी बारकाईने लक्ष ठेवले. संशयितांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणी करीता पाठवले. प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. परंतु नागरिकांचे योग्य सहकार्य न मिळाल्याने कोरोना आटोक्यात येण्याऐवजी वाढतच चालला आहे. शहरात वस्तूंची खरेदी करण्या करिता नागरिकांची चांगलीच गर्दी होत असून त्यामुळे कोरोना संक्रमणाला वाव मिळत आहे. त्याकरिता प्रशासनाने आता कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.